पुणे : आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाजाला शिस्त आणि संयम पाळावी लागेल. सरकार चुकत असेल तर बोलावे लागेल, बरोबर असेल तर कौतुक करावे लागेल. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे लागेल. मराठा समाजाने सांगितले तर आझाद मैदानावर बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याची भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली. तसेच नाशिक, कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्येही मूक आंदोलन करणार आणि लवकरच तारीख जाहीर करू अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
पुण्यात एका कार्यक्रमात खासदार संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, ५० टक्क्यांच्या पुढे आरक्षण मागणे हे गैर आहे. राज्य सरकारचा निषेध करायला हवा. ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी जनगणना व्हायला हवी. त्यात प्रत्येकाचा कोटा ठरवा. १९६७ सालापर्यंत मराठा हा ओबीसीत होता. ५० टक्के अट जोपर्यंत शिथिल होत नाही, किंवा ते न्यायालयात टिकत नाही. जनगणना करा आणि १०० टक्के आरक्षण करा. त्यात मराठा समाजाला १३ नाहीतर ३० टक्के आरक्षण मिळेल. आरक्षणाची मर्यादा वाढल्याशिवाय कोणत्याही समाजाला आरक्षण मिळणार नाही.
टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हा मराठाच आहे, मी त्याच्या घरी मी गेलो आहे. २००७ शेवटचा कालेलकर अहवाल आता लागू होतो.मराठा समाज फॉरवर्ड, डोमीनेट वर्ग आहे, असे न्यायालयाने आरक्षण रद्द करताना मत मांडले आहे. आपल्याला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जावे लागेल. राज्य SEBC फॉर्म करू शकते. पण राज्याला अधिकार दिले म्हणजे ते आरक्षण देतील, असे होत नाही असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
नांदेडला पहिलं मूक आंदोलन असेल, तयारी सुरू करा...मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या सर्व तारखा, वेळा मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांनी ठरवा. कायदा कोणी हाती घ्यायचा नाही. कोविडचे नियम पाळून आंदोलन करायचे आहे. माझी एक विनंती आहे की मी एकटंच आझाद मैदानला लाक्षणिक उपोषण करायला तयार आहे. तुम्ही आंदोलन कशाला करता? नका करू असेही संभाजीराजे म्हणाले.