Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन, काँग्रेसने ट्विट करुन दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:37 AM2021-05-16T09:37:08+5:302021-05-16T10:07:55+5:30
काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.
पुणे : काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते.
गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर, रविवारी त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
निशब्द !
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज...
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
राहुल गांधींचे विश्वासू शिलेदार
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात मोदी लाट आली होती. अशा काळात राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारली होती. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा राजीव सातव यांनी पराभव केला होता. राजीव सातव हे सध्या राज्यसभेचे खासदार असून त्यांच्या गुजरात काँग्रेसच्या प्रभारी पदाची जबाबदारी होती. राजीव सातव हे राहुल गांधी यांच्या यंग ब्रिगेडमधील विश्वासू शिलेदार आहेत. त्याचसोबत माजी मंत्री रजनी सातव यांचे पुत्र होते.