पुणे : पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरिंग व लॉन्स असोसिएशनतर्फे उद्या (दि.२२) दुपारी १२.३० वाजता, सृष्टी लॉन्स, म्हात्रे पूल काॅर्नर विविध मागण्यांसंदर्भात मानवी साखळी आणि राज्यस्तरीय मूक निदर्शने करणार आहेत.
कोरोना महामारीमुळे जवळपास वर्षभर कोणतेही मोठे कार्यक्रम झाले नाहीत. लॉकडाऊन संपल्यानंतर 'अनलॉक'मध्ये इतर व्यवसायांना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ, इव्हेंट्स, सांस्कृतिक सभागृहे, थिएटरमधील कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यासंबंधित क्षेत्रात काम करणारे साउंड, लाईट, एलईडी वॉल, जनरेटर्स, फ्लोरिस्ट, डेकोरेटर्स, मंडप, व्हिडीओग्राफर्स, फोटोग्राफेर्स, बँड, इव्हेन्ट कोऑर्डिनेटर असे अनेक व्यवसाय ठप्प आहेत. लाखो रुपयांची इक्विपमेंट्स धूळ खात पडून आहेत. तर या व्यवसायावर उपजीविका अवलंबून असलेल्या महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या सर्व घटकांचा विचार करावा याकरिता मानवी साखळी आणि मूकनिदर्शने केली जाणार असल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.