खेड, पंचायत समिती, राजगुरुनगरमध्ये हुतात्मा राजगुरुवाड्यावर हुतात्मा राजगुरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजगुरुनगर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने ध्वजवंदन करण्यात आले. खेड तहसील आवारात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाला शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रांत विक्रांत चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी तहसीलदार वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे, संतोष चव्हाण, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील याच्यासह शहरातील विविध संस्थाचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी उपस्थित होते. खेड पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच पंचायत समितीच्या सदस्यांच्या अनुपस्थित ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. पंचायत समितीच्या सदस्या वैशाली गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुखांसह, कर्मचारी उपस्थित होते हुतात्मा शिवराम हरी राजगुरूंच्या जन्मस्थळावर निवेदक कैलास दुधाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अतुल देशमुख, सुशील मांजरे, बाळासाहेब कहाणे, विठ्ठल पाचारणे, शैलेश रावळ, नरेंद्र गायकवाड, संदीप वाळुंज, सचिन भंडारी, संतोष लाखे, योगेश गायकवाड, ॲड. सुरेश कौदरे, विजय डोळस, श्रीराम खेडकर आदी शहरातील नागरिक उपस्थित होते.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी संचालक बाळासाहेब सांडभोर, ॲड. मुकुंद आवटे, माणिक आवटे, मुरलीधर खांगटे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, प्राचार्य डॉ.एच.एम.जरे, उपप्राचार्य डॉ संजय शिंदे, प्रा. एस. एन. टाकळकर, प्रबंधक कैलास पाचारणे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. भारताने ब्रिटिश साम्राज्यशाहीशी मुकाबला करून लोकशाही राष्ट्र प्रस्थापित केले आहे. भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे मूल्य म्हणून लोकशाहीकडे आपण सारे जण पाहतो. जगातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येची लोकशाही म्हणून भारताचा लौकिक सन्मानाने टिकून राहावा यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहून काम करू, असे आवाहन त्यांनी केले.
खेड पोलीस स्टेशनमध्ये ७५ व्या स्वातंत्र्यदिनाला पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला, तर तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील खेड उपविभागीय कार्यालयाचा ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी अनिल लंबाते यांच्या ध्वजारोहण संपन्न झाला. राजगुरुनगर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात बँकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. या वेळी बँकेचे विलास भास्कर, तानाजी दौंडकर, चंद्रकांत कांबळे, बाबूराव कोतवाल, मोहन पवार, शिवदास गायकवाड आदी प्रमुख बँकेच्या अधिकाऱ्यांसह व सर्व तालुक्यांतील बॅंक सेवक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना आमदार मोहिते पाटील यांनी मार्गदर्शन करून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.