पुणे: ‘‘आज कलाकार काही बोलले की त्याचा दुसरा अर्थ काढला जातो. कलाकार साॅफ्ट टार्गेट असतात. त्यामुळे त्यांना टपली मारली जाते. सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जाते. पण ट्रोलिंगने आम्हाला फरक पडत नाही. खरंतर आज एकमेकांना समजून घेण्यात आपण कमी पडतोय. फेसबुक फुकट असल्याने कोणी काहीही बोलतो. तिथेही पैसे लावले की मग लोकं समजून बोलतील,’’ अशी अपेक्षा अभिनेते, लेखक समीर चौघुले यांनी व्यक्त केली.
प्रियंकाजी महिला उद्योग व वसंतदादा सेवा संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षी राजीव गांधी कलागौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार मंगळवारी (दि.२१) अभिनेते चौघुले यांना ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, संजय बालगुडे, संजिवनी बालगुडे आदी उपस्थित होते.
चौघुले म्हणाले, राजीव गांधी कलागौरव पुरस्कार मिळाल्याने आनंद होतोय, खरंतर कौतुक होणं गरजेचे असते. मला आमच्या हास्यजत्रेत कोणाचे स्कीट आवडलं तर त्यांना मी चाॅकलेट देतो. चार्ली चॅप्लीन, पुलं आणि मिस्टर बिन हे तीन माझे दैवत आहेत. त्यांनी सामान्य माणसाला समोर ठेवून काम केले. सामान्यांना महत्त्व दिले. त्याप्रमाणे मी देखील सामान्य लोकांसाठी हास्य खुलवतो. स्वत: वर केलेला विनोद सर्वश्रेष्ठ असतो. म्हणून मी तेच करतो. सामान्य माणसाची फजिती दाखवणारे भाई म्हणजे पुलं त्यासाठीच मला आवडतात.’’
आज इतरांवर विनोद करू शकत नाही. कारण आज कोणावर विनोद केला तर त्यांच्या भावना दुखावू शकतात. भावना म्हणजे काचेहून नाजूक बाहुल्या बनल्या आहेत. म्हणून स्वत:वर विनोद करणे परवडते आणि तेच करतो, असे चौघुले म्हणाले.
पुणेकरांकडून गौरव, मुंबईला काय झाले ?
मला अनेकदा विचारले जाते की, तुम्ही हिंदीत का नाही गेलात, तर माझी इच्छा आहे. पण माझे स्वप्न मराठीतच पूर्ण होत आहे. जे मराठी लोकं प्रेम देतील ते इतर कोणीच देऊ शकत नाही. आज दोन वर्षात मला आठ पुरस्कार मिळाले आणि ते पुण्यातच मिळाले. मुंबईला काय झालं काय माहिती?’’ असा टोला चौघुले यांनी मुंबईकरांना लगावला.