पुणे : फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या नागरिकत्वातून त्यांची अखेर त्यांची झाली असून त्यांच्या डाेळ्यात आनंदाश्री दिसत आहेत. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद औसंडून वाहत हाेता.
अनेक वर्षे पाकिस्तानात राहिल्यानंतर अखेर सिंधी बांधवांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. तसेच पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. गेली अनेक वर्षे हे सिंधी बांधव भारतात राहत आहेत. परंतु त्यांच्याकडे पाकिस्तानचे नागरिकत्व हाेते. यामुळे त्यांना अनेक अडणींचा सामना करावा लागत हाेता. सातत्याने विविध फाॅर्म भरणे, पासपाेर्ट रिनिव्ह करणे, त्याचबराेबर शिक्षण आणि इतर सरकारी कामांमध्ये देखील त्यांना अनेक अडचणी येत हाेता. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळावे यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरु हाेता. अखेर आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून त्यांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
यावेळी बाेलताना 45 वर्षांच्या लाज विरवाणी म्हणाल्या, पाकिस्तानमध्ये राहत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. बाहेर काही गडबड झाली तर आम्ही घराबाहेर पडत नव्हताे. माझे पाचवी पर्यंतचेच शिक्षण सिंधी मधून झाले. आम्ही काही वर्षांपूर्वी भारतात येण्याचा विचार केला. त्यानंतर पुन्हा कधीच पाकिस्तानात जायचे नाही असा निर्णय घेतला. परंतु आमच्याकडे पाकिस्तानी पासपाेर्ट हाेता. भारतीय नागरिकत्व नसल्याने अनेक अडचणी येत हाेत्या. परंतु आता भारतीय नागरिकत्व मिळाल्याने खूप आनंद हाेत आहे.
गेल्या अनेक वर्षे हे सिंधी बांधव पुण्यातील पि्ंपरी भागात राहत आहेत. अजूनही त्यांचे काही बांधव पाकिस्तानामध्ये वास्तव्यास आहेत. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला असून पुन्हा घरी आल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत हाेती.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम म्हणाले, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणीस्तान या देशांमधील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन 45 नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या नागरिकांचे कागदपत्र आयबीकडे प्रलंबित हाेते. परंतु गेल्या दाेन महिन्यांपासून या संदर्भात झालेल्या कार्यलयीन कामकाजानंतर नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रमाणपत्र देण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्याची खात्री करण्यात आली आहे.