मुंबई - अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल पुण्यात निधन झाले. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक सोडून जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी पुण्यातील ठोसर पागेत शासकीय इतमामात 'सिंधुताई सपकाळ' यांच्या पार्थिवावार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, त्यांच्या पार्थिवाचे दफनविधी करण्यात आले.
सिंधुताईंच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील नेतेमंडळी, साहित्यिक, असंख्य तरुण-तरुणी उपस्थित होते. सिंधुताईंना अखेरचा निरोप देताना नागरिक भावुक झाल्याचे यावेळी दिसून आले. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील हजारो व्यक्तींना एक धक्काच बसला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली.
सिंधुताईंचा जन्म महानुभाव पंथात झाला होता. त्या महानुभाव पंथाचे आचरण करत होत्या, त्या निस्सीम कृष्णभक्त होत्या. महानुभाव पंथामध्ये केल्या जाणाऱ्या अंत्यसंस्काराला 'निक्षेप' असं म्हटलं जातं. या पंथामध्ये अग्निसंस्कार केले जात नाहीत तर पार्थिव दफन करतात. त्यामुळेच, सिंधुताईंच्या पार्थिवावरही दफनविधी करत अंत्यसंस्कार करण्यात आले. महानुभव पंथात दफन करण्यासाठी नेण्यापूर्वी गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते. त्यानंतर एका डोलीमध्ये पार्थिवाला दफन करण्यासाठी नेले जाते. दफनस्थळी नेल्यानंतरही गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे स्मरण केले जाते.
महानुभाव पंथात दोन प्रकार
महानुभाव पंथामध्ये दोन प्रकार मानले जातात. ज्यांनी पूर्ण दीक्षा घेतली आहे संसार प्रपंचाचा त्याग केला आहे, आश्रमात राहतात अशांना भिक्षू म्हणतात. तर, दुसरा सर्वसामान्य प्रापंचिक त्यांना वासनिक म्हटलं जातं. दीक्षा घेतलेले महानुभाव पंथी हे वासनिक प्रपंचामध्ये असणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कर्मठ असतात.