खेड : ‘इच्छा असेल, तर मार्ग दिसेल’ या उक्तीप्रमाणे पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त पद्मनाभम यांनी भूमिका घेतली. ‘सिंघम् स्टाईल’ कारवाईला सुरुवात करून चाकण परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी धडक कारवाई आणि उपाययोजनांना सुरुवातही करण्यात आली आहे. लाखो प्रवासी, शेकडो वाहनचालक यांची डोकेदुखी बनलेल्या आणि थेट संसदेपर्यंत गाजलेल्या चाकण परिसरातील वाहतूककोंडीवर पोलीस उतारा शोधण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले आहेत.राजगुरुनगर ते मोशी हा साधारण २५ किलोमीटरचा रस्ता म्हणजे वाहतूककोंडी आणि फक्त वाहतूककोंडी! ‘हा प्रवास नको रे बाबा!’ अशी प्रवासी व चालकांची प्रतिक्रिया असते. या जटिल समस्येकडे ना राजकारण्यांनी, ना पोलिसांनी आत्तापर्यंत लक्ष दिले. परिणामी, त्याचा त्रास चालक, प्रवासी वषार्नुवर्षे सहन करीत राहिले. पद्मनाभन यांनी आयुक्तालयाची सूत्रे स्वीकारल्यावर वाहतूककोंडी हा विषय अजेंड्यावर घेतला.पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या दिमतीला १५ कर्मचाऱ्यांचा ताफा आयुक्तांनी दिला. थेट आयुक्तांनी सोपवलेल्या जबाबदारीनंतर ‘सिंघम् स्टाईल’ कारवाई करून कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. टोल वसूल करणारी कंपनी, नगर परिषद यांना सूचना देण्यात आल्या. अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे तळ, रस्त्यावर कुठेही वाहन उभे करणारे चालक, मजूर अड्डे, बेशिस्त वाहनचालक यांच्यावरील कारवाई आणि विशेष म्हणजे राजकीय दबावमुक्त कारवाई सुरू झाली. दररोज २० ते २५ हजारांचा दंड वसूल होऊ लागला.तळेगाव-मोशी रस्ता ठराविक काळासाठी जड वाहतुकीस बंदचा निर्णय घेतला गेला. नो पार्किंग झोन प्रस्तावित केले. वाहतूक वॉर्डन शिस्तबद्ध झाले. याचा परिपाक म्हणून वाहतूककोंडीत अडकलेले पुणे-नाशिक व तळेगाव-चाकण हे रस्ते मोकळे झाले.पोलीस आयुक्त पद्मनाभन यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे. या गंभीर प्रश्नावर ते लक्ष ठेवून आहेत. वाहतूककोंडीवर अधिक व्यापक उपाययोजना आयुक्तांच्या सूचनेनुसार होणार आहेत. कारवाईचा बडगा सहन करण्यापेक्षा संबंधितांनी वाहतूक शिस्त पाळावी. या जटिल प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी स्वत: आयुक्त प्रयत्न करीत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणाºया घटकांविरुद्ध कारवाई अधिक धडक केली जाणार आहे.- उमेश तावसकर (पोलीस निरीक्षक, वाहतूक)
‘सिंघम् स्टाईल’मुळे होतेय वाहतूककोंडीतून सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 2:10 AM