निनाद देशमुख
अभ्यास किती वेळ करता यापेक्षा अभ्यास कसा आणि किती चांगला करता, यावर यूपीएससीच्या परीक्षेतील यश अवलंबून असते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मी क्लास लावले होते. मात्र, त्यातून काही साध्य होणार नाही हे उमगल्याने स्व-अध्ययनावर मी भर दिला. दिवसभर काम करत होतो. त्यानंतर रात्री १ ते २ पर्यंत अभ्यास करायचो. कुठलेही यश मिळाले तर त्याने हुरळून न जाता येणाऱ्या पदाची जबाबदारी ओळखून आणखी चांगले काम करावे, असा मोलाचा सल्ला भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) आयुष प्रसाद देतात. २०१५ ला संपूर्ण देशात २४ वी रँक मिळवत आयएएस झालेले आयुष प्रसाद यांची निवड महाराष्ट्र केडरमध्ये झाली आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
आयुष प्रसाद हे मूळचे झारखंड राज्यातील रांची येथील आहेत. त्यांचे शालेय शिक्षण कर्नाटक राज्यात झाले. तर दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. बी.ई. मॅकेनिकल शाखेत त्यांनी पदवी शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. विशेष म्हणजे, त्यांचे आई आणि वडील हे भारतीय प्रशासकीय सेवेतील आहेत. त्यांचे वडील कर्नाटकचे डीजीपी होते. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे, तर आई आयएएस अधिकारी असून त्या कर्नाटकच्या अप्पर सचिव आहेत. या यशात आईवडिलांचा मोलाचा वाटा असल्याचे आयुष प्रसाद सांगतात.
पूर्व परीक्षा : संपूर्ण परीक्षेच्या अभ्यासक्रमाची यादी बनवत तो आधी पूर्णपणे समजून घ्यावा. अभ्यासक्रम पूर्ण संपवावा. दोन विषयांमधील संबंध समजून घ्यावे. कुठल्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान असायला हवे. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आत्मविश्वास आणि प्रसंगावधान महत्त्वाचे आहे. पूर्व परीक्षेत येणारे बहुपर्यायी प्रश्न हे गोंधळात टाकणारे असतात. यामुळे योग्य पर्याय निवडणे हे महत्त्वाचे असते. गोंधळ होऊ न देता योग्य पर्याय निवडण्यासाठी योग्य प्रकारचा सराव हा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो.
मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेसाठी उत्तरे लिहिण्याचा सराव महत्त्वाचा आहे. तुमचे उत्तरे हे ‘टू द पॉईंट’असणे गरजेचे आहेत. त्या सोबतच विश्लेषणात्मक आणि सर्व प्रकारच्या बाजू मांडणारे हवेत. तुम्ही लिहिलेली उत्तरे ही व्यवस्थित आणि पद्धतशीर असायला हवी.
निबंध : तुमचा निबंध वेगळा कसा असेल यावर भर द्या. निबंधाच्या विषयाची पूर्ण माहिती असायला हवी. निबंधाचा गोषवारा, विषय परिचय, मजकूर आणि निष्कर्ष हा स्पष्ट असावा. निबंध लिहिण्याचा सराव वारंवार करा. यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करावा.
मुलाखत : मुलाखत देताना स्पष्ट आणि थेट बोलावे. बोलताना आपल्यातील आत्मविश्वास हा मुलाखत घेणाऱ्यांना दिसावा. यासाठी सातत्याने सराव करावा लागेल. मुलाखत कोणत्याही भाषेत देता येते. यामुळे भाषा येत नसल्याची भीती बाळगू नका. आपल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे बारकावे आपल्याला माहिती असायला हवेत.
फोटो : आयुष प्रसाद