यूपीएससी म्हणजे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व अन् खरेपणाची परीक्षा : पंकज देशमुख
अभिजित कोळपे
जे तुमच्या आतमध्ये आहे ते समोरच्याला दिसणे गरजेचे आहे. आक्रस्ताळेपणा, खोटारडेपणा, वेळ मारून नेणाऱ्या लोकांना शासन व्यवस्थेत जागा नाही. कारण तुमचे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि खरेपणा हेच तपासणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा आहे. त्यामुळे भाबडा आदर्शवाद किंवा भोळेपणा न ठेवता. प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा, असा मोलाचा सल्ला केवळ दुसऱ्याच प्रयत्नात संपूर्ण देशात १३७ वी रँक मिळवलेले पंकज देशमुख देतात. सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड येथे उल्लेखनीय कार्याचा ठसा देशमुख यांनी उमटवला आहे. सध्या पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) झोन-४ येथे ते कार्यरत आहेत.
अभियांत्रिकी शाखेतून पदवी मिळवणारे पंकज देशमुख हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे. २०११ साली त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली. आईवडिलांचा भक्कम पाठिंबा असतानाही पदवीनंतर सुरुवातीला दोन वर्षे नोकरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर ठरवून पुढील दोन वर्षांत यूपीएससीत यशस्वी व्हायचेच या निर्धार, नियोजनात परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अभ्यास पद्धतीत उलट दिशेने बदल केला. परीक्षेत काय विचारले जाते, त्याचे नेमकेपणाने उत्तरे लिहिले. त्यामुळे दुसऱ्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाल्याचे देशमुख सांगतात.
----
नवीन विद्यार्थ्यांना सल्ला
* प्रशासकीय सेवेत अनेक आव्हाने आहेत. आपल्याला ती पार करणे शक्य आहे का, हे तपासून पाहा. स्वतःचे प्रधानक्रम पाहा. आपल्याला यूपीएससीची परीक्षा देणे शक्य होईल का, की केवळ ऐकिव माहिती आणि प्रसिद्धीझोतात जीवन जगता येईल, या आशेने या परीक्षेकडे पाहत असाल तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. त्यामुळे व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या. कारण स्पर्धा परीक्षा हे काही अंतिम धेय्य असू शकत नाही. इतर परीक्षेसारखीच ही देखील एक परीक्षा आहे. त्यामुळे अपयश आल्यानंतर खचू नका. इतरही अनेक चांगली क्षेत्रे आहेत. ज्यात आपण चांगले काम करू शकतो. मात्र, यूपीएससी करणार असाल तर दोन-तीन वर्षांचे व्यवस्थित नियोजन करा. त्यात यश आले तर ठीक. अन्यथा वेगळे क्षेत्र निवडा. कारण यात गुरफटून गेल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे वाया जाातात. मग नैराश्य येते. त्यामुळे अपयश जरी आले तरी खचू नका. नवीन संधी शोधा.
------
मुख्य परीक्षा/मुलाखतीची तयारी
* गेल्या दहा वर्षांत परीक्षेत खूप बदल झाले आहेत. ते समजून घ्या. वाचन, ज्ञान याबरोबरच ही तीन तासांची परीक्षा आहे. या तीन तासांत जे तुम्ही द्याल, त्यावरच तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहात. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय, सामान्य अध्ययनाचे पेपर सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करा. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा. नियमित वर्तमानपत्र वाचन, नोट्स काढा. महत्त्वाचे म्हणजे तीन तासांत मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा सराव करा.
* मुलाखतीची तयारी एक दिवस अथवा एका महिन्यात होत नाही. आपले व्यक्तिमत्त्व, चारित्र्य यात दैनंदिन सुधारणा करू शकता. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. शासनाला सकारात्मक विचारांच्या प्रशासकांची नितांत गरज आहे. त्यामुळे तुमच्या आतमध्ये जे आहे, तेच यूपीएससीच्या पॅनेल प्रमुखांना दिसायला हवे. कारण ही मुलखात म्हणजे तुमचे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि खरेपणा तपासणारी परीक्षा आहे.
फोटो : पंकज देशमुख