फोकस पद्धतीने स्वयंअध्ययन केल्यास पहिल्या प्रयत्नातही मिळते यश : अक्षय अग्रवाल
अभिजित कोळपे
योग्य मार्गदर्शन, संदर्भ साहित्याचा वापर आणि नियोजन करून अभ्यास केल्यास तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पहिल्या प्रयत्नातदेखील यशस्वी होऊ शकता. अगदी कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासशिवाय हे यश मिळवू शकता, हे धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे अक्षय अग्रवाल यांनी दाखवून दिले आहे. घरीच राहून स्वयंअध्ययन करत त्यांनी २०१८ साली पहिल्या प्रयत्नात संपूर्ण देशात ४३ वी रँक मिळवत जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला. ओडिशातील केंद्रपाडा येथे एक वर्ष सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर सध्या मसुरी येथे आयएएस फेज-२ चे प्रशिक्षण ते घेत आहेत.
मूळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अक्षय अग्रवाल यांनी पुण्यातून बी. टेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले आहे. तसेच सिंगापूर येथून अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी केले आहे. वडील व्यावसायिक तर आई गृहिणी आहे. दोघांनीही उच्च शिक्षण आणि यूपीएससीच्या तयारीसाठी पहिल्यापासून प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्याचे अक्षय अग्रवाल सांगतात.
--------
तीव्र गतीने लिहिण्याचा सराव हवा
मी स्वतः कोणत्याही कोचिंग क्लासची मदत घेतली नाही. मात्र, तुम्हाला गरज असेल तर कोचिंग क्लासची मदत घेऊ शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके मार्गदर्शनासाठी वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासावेळी सोशल मीडियाचा वापर शक्यतो टाळावा. दिवसात ६-८ तास एक वर्षभर नियमितपणे अभ्यास करावा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुस्तके वाचल्यावर प्रश्न सोडवण्याचा वारंवार सराव करावा. तीव्र गतीने पेपर सोडविण्याचा सातत्याने सराव गरजेचा आहे. तरच अंतिम परीक्षेत याचा फायदा होतो.
-----
पूर्व, मुख्य अन् मुलाखतीची तयारी एकत्रित करा
यूपीएससीत पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी एकत्रित करावी लागते. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेचा ७० टक्के अभ्यासक्रम जवळजवळ सारखाच आहे. त्यामुळे सुरुवातीला ५-६ महिने दोन्ही परीक्षेचा सोबत अभ्यास करावा. तसेच पूर्वपरीक्षा संपल्यावर लगेच मुख्य परीक्षेवर फोकस करावा. मुख्य परीक्षेच्या आधी तीन महिने प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा.
-------
वैकल्पिक विषय विचारपूर्वक निवडा
मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वैकल्पिक विषय विचारपूर्वक निवडावा. परीक्षेत एकही प्रश्न रिकामा राहणार नाही, याची खात्री करावी. मुलाखतीसाठी डिटेल अप्लिकेशन फॉर्म आणि वैकल्पिक विषय पुन्हा तयार करून जावे. नियमितपणे वर्तमानपत्र वाचणे पूर्व, मुख्य आणि मुलाखतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
फोटो : अक्षय अग्रवाल