अभिजित कोळपे
केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा ही आता वस्तुस्थितीवर आधारितपेक्षा (फॅक्ट) स्वत:च्या मतावर आधारित (ओपिनियन बेस) जास्त झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विविध विषयांबद्दल स्वत:चे मत असणे फार गरजेचे झाले आहे. पूर्व, मुख्य परीक्षो असो की थेट मुलाखत. या प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याचे मत विचारात घेतले जात असून, त्याला जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे एकएकट्याने अभ्यास करू नका. गटागटांत अभ्यास करा. तुम्हाला प्रत्येक विषयावर इतरांचीही मतं कळतात. त्यातून तुम्हाला स्वत:मध्ये बदल करता येतात. एकट्याने अभ्यास करताना तुमची दिशा भरकटू शकते. किमान चार-पाच जणांचा ग्रुप तयार करून एकत्रित अभ्यास करणे फार आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला त्रिपुरा राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव किरण गित्ते हे विद्यार्थ्यांना देतात.
किरण गित्ते हे मूळचे बीड जिल्ह्यातील परळीजवळील बेलांबा गावचे. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले आहे. पुण्यात टेल्को कंपनीत नोकरी करतच त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी), तर नंतर यूपीएससीची परीक्षा दिली. दोन्हीही परीक्षेत त्यांना यश मिळाले आहे. एमपीएससीमधून त्यांना तहसीलदार हे पद मिळाले होते. मात्र, त्यांना ‘आयएएस’च व्हायचे असल्याने त्यांनी नोकरी करतच वेळेचे नियोजन करत यूपीएससींची तयारी सुरू ठेवली. भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) त्यांची २००५ साली निवड झाली आहे. महाराष्ट्रात त्यांनी प्रतिनियुक्तीवर पाच वर्षे काम केले आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षे, तर पुण्यात पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.
स्पर्धापरीक्षेचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक स्तरावर स्पर्धा असतेच. प्रत्येक विषयावर अनेक संदर्भ पुस्तके आहेत. यूपीएससी परीक्षेचा पॅटर्न पूर्ण बदललेला आहे. पदवी शिक्षणानंतर यूपीएससीची तयारी करणे अवघड, कठीण जाऊ शकते. त्यामुळे उच्च महाविद्यालयीन पदवी शिक्षण घेत असतानाच साधरण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षांपासून यूपीएससीची तयारी सुरू करणे गरजेचे आहे.
यूपीएससीची तयारी करताना प्रत्येक विद्यार्थ्यांने सुरुवातीला बदललेला संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यावा. त्यानंतरच अभ्यासाला सुरुवात करावी. अनेक जणांना रोज अभ्यास किती तास करायचा, हा प्रश्न पडलेला असतो. साधारण रोज आठ ते दहा तास अभ्यास केला तरी पुरेसा आहे. पण तो करताना मन लावून गुणात्मक (क्वाॅलिटी) अभ्यास व्हायला हवा. कोणत्याही विषयाची मूळ पुस्तके (टेक्स्ट बुक) वाचायला हवी. आजकाल अनेक विद्यार्थी गाईड किंवा इतरांच्या नोट्सचा वापर करतात. मात्र, गाईडच्या वापराऐवजी एनसीआरटी दिल्ली बोर्डाची (NCERT) पाचवी ते बारावी इयत्तेपर्यंतची मूळ पुस्तके वाचणे फार आवश्यक आहे. प्रत्येक विषयाचे अथवा वर्तमानपत्राचे वाचन करताना स्वत:च्या नोट्स काढणे फार गरजेचे आहे.
यूपीएससीची तयारी करताना पूर्व, मुख्य अथवा मुलाखतीच्या तीनही टप्प्यांवर प्रत्येकाने क्लास लावलाच पाहिजे असे काही नाही. तुम्ही वैयक्तिक तयारी देखील करू शकता. मात्र, त्यासाठी त्या-त्या विषयांच्या शिक्षक, तज्ज्ञ अथवा यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांकडून ठराविक वेळेनंतर किंवा अडचण आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
फोटो : किरण गित्ते