अभिजित कोळपे
करिअरच्या दृष्टीने उत्तम राजमार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा.
स्पर्धा परीक्षा ही केवळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने गुणवत्तेचा कस लावणारी आहे. त्यात ग्रामीण आणि शहरी असा भेद मुळी होतच नाही. येथे फक्त गुणवत्ता तसेच अधिकारी पदासाठीची पात्रता पाहिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती अथवा न्यूनगंड बाळगू नये, असा मोलाचा सल्ला केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातील (जीएसटी) पुण्याच्या सहआयुक्त वैशाली पतंगे विद्यार्थ्यांना देतात.
महाविद्यालयीन जीवनापासून माहिती घेत योग्य नियोजन करत अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश नक्की मिळू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम ध्येय निश्चित करावे. यूपीएससीच्या अभ्यासक्रमाची मूळ पुस्तके आणि प्रश्नपत्रिकांचा सातत्याने सराव करावा. यासाठी इंटरनेट, शासकीय मासिके, विविध शासकीय संकेतस्थळांचा वापर आवश्यक आहे. ते जास्त विश्वासार्ह आणि सतत अपडेटेड असते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य आणि परिश्रम हाच यशाचा राजमार्ग आहे, असा मोलाचा सल्लादेखील वैशाली पतंगे देतात.
विवाहानंतर यूपीएससीच्या परीक्षेत तब्बल पाच वेळा उत्तीर्ण होण्याची किमया वैशाली पतंगे यांनी केली आहे. तर त्याआधी एमपीएससी परीक्षेतही त्यांची निवड झाली होती. सातारा येथे त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काही काळ काम केले आहे. त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील दुर्गम अशा पाटण तालुक्यातील डोंगरांनी वेढलेले कुंभारगाव हे आहे. वडील शासकीय नोकरीत असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या निमित्ताने पतंगे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले होते. त्यामुळे त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या वडिलांना वाचनाची मोठी आवड होती. लहानपणापासून त्यांनाही त्यामुळे साहित्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या घरात सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. शालेय वयापासूनच कथा, कादंबऱ्यापासून तत्त्वज्ञानापर्यंत अनेक प्रकारची पुस्तके त्यांनी शालेय जीवनात वाचून काढली होती.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम प्रचंड मोठा आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, काय वाचावे आणि काय वाचू नये. स्पर्धा परीक्षेसाठी अनेक प्रकाशनांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ती सर्व पुस्तके वाचण्याआधी मूळ पुस्तके वाचणे आवश्यक आहे. बाजारातील इतर खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा केवळ तज्ज्ञांच्या आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सल्ल्याने वापर करावा. मुख्यत: एनसीईआरटीची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके वाचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी नियोजन फारच गरजेचे आहे. दिवसातील सलग १० ते १५ तास अभ्यास आवश्यक आहे. स्वयंअध्ययन, गटचर्चा करणे, इंटरनेटचा वापर करणे, शासकीय विविध संकेतस्थळांचा वापर करणे, बातम्या पाहणे, माहितीपट पाहणे आदी माध्यमातून अभ्यास करता येतो. मात्र, कोणते माध्यम आपल्याला सोयीचे आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवावे. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सातत्याने वैकल्पिक प्रश्न सोडवण्याचा सराव करणे आवश्यक आहे.
आपण ग्रामीण भागातून आहोत किंवा आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही. मुलाखतीला जाताना भाषेचा कोणत्याही प्रकारे न्यूनगंड बाळगू नका. आपण कोणत्याही माध्यमातून (भाषा) मुलाखत देऊ शकतो. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर आपण जे ज्ञान मिळवले, त्याचा वापर कसा करू शकतो याची चाचणी म्हणजेच मुलाखत आहे. अंतिम मुलाखतीला जाण्यापूर्वी त्याचा वारंवार सराव मात्र गरजेचा आहे.
फोटो : वैशाली पतंगे