खेड : मोरोशी (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत. मात्र, फक्त एकच शिक्षिका या शाळेत कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंचायत समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याने पालक संताप व्यक्त करीत आहेत. आदिवासी भागातील मोरोशी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पट आहे. जिल्हा परिषदेच्या नियमानुसार दोन पदवीधर व दोन उपशिक्षक असणे आवश्यक आहे. परंतु, येथे एकच शिक्षणसेवक म्हणून नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका कार्यरत आहेत. दुसरी शिक्षिका गेली दोन वर्षे काही कारण न देता दोन वर्षांपासून रजेवर आहे. सातही वर्ग एकाच खोलीत भरत आहेत. त्या सर्व इयत्ता एकाच वर्गखोलीत शिक्षण घेत आहेत. अशीच स्थिती आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत पालक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, शिक्षणसंस्थांमध्ये असलेले अनेक शिक्षक-शिक्षका कर्तव्य योग्यपणे बजावत असल्याचे दिसून येत नाही. अनेकदा शिक्षक रजेवर असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. शिक्षकांच्या याच वर्तनाचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाºया शिक्षणावर होतो आहे. योग्य प्रकारे शिक्षण मिळत नसल्याने ते शिक्षणात कच्चेच राहतात. मात्र, शिक्षकांची कमतरता ही एकच चिंतेची बाब नाही, तर सर्व शिक्षा अभियान योजना, शिक्षण हक्क कायदा हे सर्व सरकारी योजना कायदे असूनही शेकडो आदिवासी, कातकरी मुले शिक्षणाच्या परिघाबाहेरच आहेत. शिक्षणाची आवड, भविष्याचे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा शिक्षक या दुर्गम भागात आवश्यक आहे. आज असलेल्या शिक्षकांमध्ये अपवाद शिक्षक या विचारांचे आहेत. या शिक्षकांनी सहकारी शिक्षकांचे उद्बोधन करून त्यांना या प्रवाहामध्ये, या कामासाठी सामील करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने शिक्षकांच्या संख्येचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विचार करणे गरजेचे आहे.............आदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी आहेत. न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याने जिल्हा परिषदेकडून शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. आदिवासी भागातील या शाळांमध्ये शिक्षकांची केंद्रनिहाय उपलब्ध शिक्षकांमधून आवश्यक बदल व शिक्षकांची व्यवस्था केली जाईल. - संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, खेड)..........मोरोशी जिल्हा परिषद शाळेत जूनपासून एकच शिक्षक असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. एक शिक्षक सात वर्ग कसा शिकवू शकतो? दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास आम्ही आमची मुले शाळेतून काढून सोईनुसार इतर शाळेत प्रवेश घेऊ.- महादेव खंडागळे, पालक, मोरोशी
एक ते सात वर्गांना एकच शिक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 1:49 PM
पालकांना चिंता : खेडच्या आदिवासी भागातील स्थिती
ठळक मुद्देप्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पटआदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी