पुणे : सिंहगड किल्ला परिसर विकास आरखड्यानुसार पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून पुणे वन विभागानं किल्यावर अनेक महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत किल्यावर प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच किल्यावर खाजगी वाहनांना बंदी घालण्यात येणार असून किल्यावर जाण्यासाठी ई वाहनांची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षण राहूल पाटील यांनी दिली.
सिंहगड किल्ले परिसराच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मंगळवारी स्थानिक नागरिक, संयुक्त वन व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी वरिल माहिती दिली.
पाटील म्हणाले, सिंहगड किल्ल्यावर पर्यटन वाढीसाठी येत्या काळात आमुलाग्र बदल केले जाणार आहे. किल्ल्याचं पावित्र्य जपण्यासाठी पुरातत्व खातं आणि वनविभाग मिळून काम करणार आहे. सिंहगड पर्यटन विकास आरखड्यानुसार किल्ल्यावर यापुढे खाजगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. वाहनतळासाठी किल्ल्याच्या खाली काही एकरात सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. येथून किल्यावर जाण्यासाठी ई वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गडाचं पावित्र्य जपण्यासाठी किल्यावर पूर्णपणे प्लॅस्टीक बंदी केली जाणार आहे. प्लास्टिक घेऊन जाताना कुणी आढळ्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
स्थानिकांनी उभारलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल संपूर्ण किल्ल्यावर आहेत. मात्र, हे स्टॉल झोपड्यांमध्ये उभारलेले आहे. हे चांगले दिसत नाही. या व्यावसायिकांसाठी किल्यावर दोन ठिकाणी फुड मॉल उभारण्यात येणार आहे. या फुड मॉलध्ये किल्यावरील सर्व व्यावसायिकांसाठी एकत्र आणलं जाणार आहे.
किल्ल्यावरील वाहनतळाच्या ठिकाणी पार्कींगची समस्या आहे. ही समस्या दुर करण्यसाठी १५ इलेक्ट्रिक बसेस भाड्याने घेण्यासाठी पीएमपीएमएलसोबत करार करण्यात येणार आहे. पाण्याची समस्या सोडवण्याठी किल्ल्यावर वॉटर फिल्टर प्लँट उभारण्यात येणार आहे. वर्षानुवर्षे हा किल्ला लोकांचे आवडत ठिकाण बनले आहे. सर्व क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने किल्ल्याला दररोज भेट देतात. कोरोनामुळे सध्या पर्यटन बंद असले तरी येत्या काळात लवकरच पर्यटन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
स्थानिक उलगडणार किल्याचा इतिहास
''किल्ले सिंहगडाला मोठा इतिहास आहे. किल्याची माहिती देणारे मोजकीच मंडळी आहेत. यामुळे किल्यावरील जवळपास ३० स्थानिकांना गाईडचे प्रशिक्षण वनविभाग आणि पुरातत्व विभाग देणार आहे. या साठी काही इतिहास तज्ज्ञांची बोलणी सुरू आहे. त्यांच्यामाध्यमातून किल्यांचा संपुर्ण माहिती त्यांना दिली जाणार आहे. हे ३०जण गडावर मार्गदर्शक म्हणून काम करतील. यामुळे त्यांना उत्पन्न मिळेल आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाविषयी अचूक माहिती मिळणार असल्याचं उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी सांगितलं.''