पुणे : सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांनी सिटी स्कुलच्या सव्वाशे हून कर्मचार्यांच्या पगारातून भविष्यनिर्वाह निधीची कपात करुन ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा न करता तब्बल ७० लाख ९२ हजार ८६२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मारुती निवृत्ती नवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिकारी राहुल एकनाथ कोकाटे (वय ५१, रा. तुपेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कुलमध्ये ऑक्टोबर २०१९ ते जून २०२२ पर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड इन्स्टिट्युटचे संस्थापक मारुती नवले यांच्या सिंहगड सिटी स्कुलमध्ये साधारण ११५ ते १३६ कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारातून नवले यांनी भविष्य निर्वाह निधी म्हणून ७४ लाख ६८ हजार ६३६ रुपये एवढी कपात केली. त्यापैकी फक्त ३ लाख ७५ हजार ७७४ रुपये एवढी रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा केली. उर्वरित ७० लाख ९२ हजार ८६२ रुपये खात्यात जमा न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन कर्मचार्यांचा विश्वासघात केला.
हा प्रकार समोर आल्यानंतर भविष्य निर्वाह निधी खात्याने पोलिसांकडे तक्रार केली़ परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करुन घेऊन अहवाल देण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.