पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कित्येक वर्षांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे. येथील रहिवाशांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे मदतही मागितली होती. सरकारनं या समस्येची दखल घेऊन उड्डाणपूल उभारण्याला मान्यता दिली होती. अखेर सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे.
उद्या शुक्रवार दि २४ सप्टेंबरला सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाबरोबरच कात्रज चौकातील उड्डाणपुलाचं भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) यांच्या हस्ते होणार आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या उड्डाणपुलामुळे खडकवासल्यापर्यंत जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लागणार आहे.
जून महिन्यात उड्डाणपुलासाठी १३५ कोटींची तरतूद महापालिकेनं मंजूर केली होती. त्यानंतर निविदा प्रक्रियेला मान्यता मिळाल्यानंतरही काम रखडलं होते. मात्र आता प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कामासाठी आवश्यकतेनुसार आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाणार आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित उड्डाणपुलाची लांबी एकू ण २.५ किलोमीटर एवढी आहे.
दोन टप्प्यात उड्डाणपूल उभारण्यात येणार असून स्वारगेटहून वडगांव धायरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना कुठेही न थांबता थेट फनटाइम चित्रपटगृहापर्यंत जाता येणार आहे. तसेच वडगांव धायरीहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. महापालिकेच्या प्रकल्प विभागाच्या आर्थिक आराखड्यानुसार उड्डाणपुलासाठी १३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कात्रज चौकातील कामाला गती
कात्रज-कोंढवा सहा पदरी रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या अंतर्गत वंडरसिटी येथून राजीव गांधी प्राणी संग्रहालय मार्गे राजस सोसायटीपर्यंत उड्डाणपूल करण्यात येणार आहे. या कामाचेही भूमिपूजनही शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. प्राणी संग्रहालयाच्या जागेत उड्डाणपुलाचे खांब उभारण्यात येणार आहेत.