पुणे : सिंहगडावर पर्यटकांना जाण्यासाठी रोपवे तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी वनविभागाकडून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या असल्याचा दावा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केला होता. मात्र, वनविभागाकडून या कामास परवानगी मिळत नसल्याने हा प्रकल्प रखडला असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंहगड शहरापासून जवळ गड पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी होते. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. सिंहगडावर जाण्यासाठी घाट रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र, गडावर जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्याने वाहतूककोंडी होते. तसेच पावसाळ्यात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करावी लागते. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर रोपवे करण्यात यावा, अशी मागणी पर्यटकांकडून करण्यात आली होती. गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतरकरवाडीत रोपवेचे केंद्र उभे करण्याचे प्रस्तावित असून ही जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे. या प्रकल्पासाठी वनविभागाकडून मान्यता मिळालेली आहे, असा दावा पीएमआरडीएकडून केला जात आहे. मात्र, सिंहगड प्रकल्पासाठी निवड केलेल्या उद्योजकाने आतकरवाडी वनविभागाच्या हद्दीत असल्याने तेथे विकासात्मक काम करणे अवघड जात आहे, असे सांगितले होते. त्यामुळे वनविभागाच्या परवानगीनंतरच या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.११६ कोटी रुपयांचा प्रकल्पसिंहगडावरील रोपवे प्रकल्प खासगी विकसकाकडून करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये सिंहगडावरील रोपवेची प्रतिकृती मांडण्यात आली होती. सुमारे ११६ कोटींचा हा प्रकल्प असून त्यातील ४१ कोटी रोपवेसाठी खर्च होणार आहेत. गडावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट असून आतकरवाडी ते गडावर असलेल्या दूरदर्शनच्या मनोºयाशेजारील जागेपर्यंत हा प्रकल्प होणार आहे.