पुणे: सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.एम. एन .नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्याचा निर्णय पुणे विभाग सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी घेतला आहे. नवले यांनी सात दिवस तुरुंगवास भोगला त्यामुळे त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्यात आले आहे.दरम्यान या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सिंहगड इन्स्टिट्यूट चांगलेच चर्चेत आले आहे .प्राध्यापकांच्या वेतनाचा प्रश्न तसेच शासनाकडून प्राप्त होणारी शिष्यवृत्तीची रक्कम यामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट बाबत शिक्षण क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. त्यात आता सिंहगडचे अध्यक्ष एम. एन.नवले यांचे विश्वस्तपद रद्द केल्यामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
पुणे विभागीय सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख म्हणाले, एखाद्या संस्थेच्या विश्वस्तास न्यायालयाकडून शिक्षा सुनावन्यात आली आणि संबंधित व्यक्तीला तुरुंगात कारावास भोगावा लागला तर अशा व्यक्तीचे विश्वस्तपद रद्द करण्याचा अधिकार धर्मदाय आयुक्त कार्यालयाला आहे .त्यानुसार सोमवारी डॉ.एम. एन. नवले यांचे विश्वस्त पद रद्द करण्यात आले.