प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साहेब, मला अंत्यविधीला जायचं आहे, गाडीत बसू द्या, तर कोणी म्हणतं आईची तब्येत ठीक नाही रुग्णालयात दाखल केले आहे तिच्या उपचारासाठी जात आहे. काही जण तर मी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहे. शासकीय कामासाठी जात आहे, असे सांगितले आहे. तीच ती कारणे देऊन काही जण एसटीचा प्रवास करीत आहेत. यात सर्वाधिक कारणे अंत्यविधी व रुग्णालय हीच सांगितले जात आहेत. एसटी प्रशासनही खातरजमा न करता त्यांना प्रवास करू देत आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने एसटी सेवेवर कडक निर्बंध लावले. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा अत्यावश्यक कारणासाठी एसटीने प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी खूपच कमी प्रमाणात प्रवास करीत आहेत. दुसरीकडे रुग्णालय, अंत्यसंस्काराला जाणे हे अत्यावश्यक कारणामध्ये समाविष्ट होत असल्याने एसटी प्रशासनाचा देखील नाईलाज होत आहे. एका एसटीमधून २२ प्रवासीच प्रवास करू शकते अशी अट आहे.
चौकट 1
एक सही अन् मग होतो एसटी प्रवास
एसटी कर्मचारी प्रवासी गाडीत बसण्यापूर्वी त्यांना कारण विचारतो. प्रवासी जर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असेल तर त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी करतो. जर कोणी अंत्यविधी वा रुग्णालयाचे कारण सांगितले तर त्यांना एका कागदावर कारण लिहून सही करायला सांगतात. मग ते प्रवास करण्यास योग्य ठरतात.
चौकट : 2
कोणती कारणे सांगतात
प्रामुख्याने अंत्यविधीला व रुग्णालयाच्या कारणानिमित्त जात आहे हे कारण सांगितले जाते. शिवाय आता कॉलेज बंद आहे, येथे थांबून काय करायचे, जेवणाची सोय नाही म्हणून गावी जात आहे, अशी कारणेही सांगितली जातात.
चौकट ; 3
मुंबईकडे ओढा
पुणे विभागात एकूण १३ आगार आहेत. यात स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), चिंचवड, इंदापूर, बारामती आदी प्रमुख आगारांचा समावेश होतो. मंगळवारी पुणे विभागाच्या २२ गाड्या धावल्या. यात पुणे-दादर, पुणे-कोल्हापूर, पुणे-नाशिक, पुणे-बारामती आदी गाड्यांचा समावेश आहे. यात सर्वात जास्त फेऱ्या पुणे-दादर दरम्यान झाल्या आहेत. मंगळवारी स्वारगेट बस स्थानकावरून एकही गाडी सुटली नाही तर वाकडेवाडी बस स्थानकावरून ६ गाड्या सुटल्या.
कोट ;
पास किंवा ओळखपत्र दाखविण्यावरून कधी कधी किरकोळ वाद होतो. फक्त चार ते पाच जणांसाठी एसटी सोडणार नसल्याचे सांगितले की काही प्रवासी हुज्जत घालतात. त्यांची समजूत काढावी लागते.
सचिन शिंदे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट बसस्थानक, पुणे.