सुनील जगताप -
उरुळी कांचन : वळती , शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या गावातील नागरिक व व्यावसायिक यांच्यासह कालच्या ढगफुटीचा सगळ्यात जास्त फटका बसला तो बळीराजाला.. त्याच धर्तीवर पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना माहिती देताना साठ वर्षीय शेतकरी विलास रामचंद्र कुंजीर म्हणाले, '' साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही.. कारण या पावसाने नुकसान होण्याजोगे काही शिल्लक ठेवलेच नाही तर घाबरु कशाला?..'' या साठ वर्षीय शेतकऱ्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आणि हा काळजाचा ठाव घेणाऱ्या संवादाने उपस्थित असलेले सारेच जण काहीवेळ गहिवरले.
विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत. दोन विहिरी मातीने व दगड धोंड्यामुळे बुजल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोमवारी ( दि. १९) वळती, शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी ढगफुटीने झालेल्या सर्वप्रकारच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभाग, इरिगेशन विभागांच्या समन्वयातून करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत पाठवावेत असे आदेश देशमुख यांनी दिले.यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, प्रशासक निकेतन धापटे आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीमधील सर्वच ओढ्या - नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहे. हे अतिक्रमणे कायमस्वरुपी हटण्यासाठी हवेलीमधील लोकप्रतिनिधी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच बोलविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सांगितले. यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, वळती हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास ढगफुटी पाऊस झाल्याने, वळती परीसरातील हजारो एकर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील फळबागा, कांदा, तरकारी, भुईमूग, चारा पिके याचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आमदार या नात्याने वळती येथील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.