उंडवडी कडेपठार: बारामती तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोना उपायांसह निर्बंध तोडणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जात आहे. मात्र, ग्रामीण भागात कारवाईचे होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जणांकडून कोरोना नियमांची पायमल्ली होत आहेच, पण आता पारावर पूर्वीसारख्याच गप्पा रंगू लागल्या आहे. त्यामुळे साहेब, आता एकदा तरी गावाकडं बघाच!, असे साकडे गोजुबावी ग्रामपंचायतीने पोलिसांना घातले आहे.
गोजुबावी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराच्या परिसरात सोडियम हायपो-क्लोराइडने नियमित क्लोरिनेशन सुरू आहे. औषध फवारणी तसेच संपूर्ण गावात सुद्धा औषध फवारणी वेळोवेळी करत आहे. अँटिजन टेस्ट कॅम्प घेऊन लोकांची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेटी देऊन त्यांना औषध पुरवठा नियमित करून देत आहे. ग्रामपंचायतीकडून कोरोनाला रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु काही नागरिक जे बाधित आहेत ते इतर लोकांचा विचार न करता विनामास्क गावकट्ट्यावर बसत आहेत. विनाकारण गावात फिरत आहेत. त्यांच्यामुळे इतर ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळावे म्हणून ग्रामपंचायतीने पोलीस प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे.
पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास जे विनाकारण विनामास्क फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करणे सोपे जाईल. त्याचबरोबर लसीकरण केंद्रासाठी गेल्या दीड महिन्यापासून पाठपुरावा करून देखील अजून गोजुबावी गावात लसीकरण केंद्र चालू केले नाही. गोजुबावी गावातील वाढत असलेली रुग्णांची संख्या रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासने सहकार्य करावे. तसेच गावात लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी सरपंच माधुरी कदम, उपसरपंच दुर्गादास भोसले, ग्रामसेवक सतीश बोरावके, ग्रा.पंचायत सदस्य किशोर जाधव, पोलीस पाटील नितीन गटकळ तसे सर्व्हे करणारे सर्व शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांनी मागणी केली.
ग्रामपंचायत गोजुबावीच्या माध्यमातून गावात औषध फवारणी करताना.
१००५२०२१ बारामती—०३
—————————————
ग्रामपंचायत गोजुबावीमधील रुग्णांची आकडेवारी
आज अखेर एकूण रुग्ण :- १५५
सक्रिय रुग्ण :- ४४
रुग्णालयात :- २९ घरी क्वारंटाइन :- १५
बरे झालेले रुग्ण :- १०७
आज अखेर मृत्यू :- ०४