बारामती : मी काय करतो साहेबांना सांगतो... साहेब तुम्ही जनावरांकडे बघताय की... कुत्र्याकडे.. साहेब म्हटले ,मी जनावरांकडे बघतो...तर मग मी कुत्र्याकडे बघतो... अनं सुप्रियाला म्हणतो... राहिलेलं तू बघ... अरे काय चेष्टा चाललीय... मी या संदर्भात एका झटक्यात बंदोबस्त करेन.... अशा शब्दात विरोधी पक्षनेते यांनी त्यांच्या खास शैलीत सुनावले.
विरोधी पक्ष नेते पवार सोमवारी(दि १) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाची पाहणी केली. पाहणी नंतर त्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण केले. त्यानंतर यावेळी आयोजित कार्यक्रमात एका नागरिकाने शहरातील भटक्या श्वानांचा, जनावरांचा वाढता उपद्रव थांबवण्याची मागणी पवार यांच्याकडे केली. त्यावर पवार यांनी आपल्या रोखठोक शैलीत संबंधितांना सुनावले. यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला.
यावेळी पवार यांनी शहरात भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी एक कोंडवडा तयार करण्याची सुचना केली. बास झाली नाटक, जनावरे कोणाचीही असली तरी पकडून कोंडवाड्यात टाका. संबंधितांकडुन पाच ते दहा हजार रुपये दंड आकारा. कोणाचेही लाड करु नका, म्हणजे हे थांबेल. तसेच भटक्या श्वानांची नसबंदी करू, असे सांगितले. पुण्यात पालकमंत्री असताना बेवारस कुत्र्यांसाठी उपाययोजना केल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना म्हणाले, सत्ता असो वा नसो, बारामतीच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आपली कामे ठरलेल्या वेळात पूर्ण होतील, असे सांगायलाही पवार विसरले नाहीत.