पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गावर वारंवार होत असलेले अपघात रोखण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अधिक सुरक्षित व्हावे यासाठी बीआरटी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर सायरन बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर गतिरोधक, बोर्ड बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली.नगर रस्ता बीआरटी मार्गाचे उद्घाटन होऊन ती कार्यान्वित झाल्यानंतर तिथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. पालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बीआरटी मार्ग सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जगताप यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी बीआरटीची बैठक झाली. या वेळी पीएमपी व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा, महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मयुरा शिंदेकर उपस्थित होत्या. प्रशांत जगताप यांनी सांगितले, ‘‘बीआरटी मार्गावर गतिरोधक उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरूच्या धर्तीवर बीआरटी मार्गावर तीन ठिकाणी पादचाऱ्यांसाठी सायरन बसविला जाणार आहे. हे सायरन सिग्नलला जोडले जाणार आहेत. पादचारी रस्ता ओलांडत असताना हा सायरन वाजणार आहे. बीआरटी मार्गावरील रोलिंगची उंची वाढविली जात आहे. या मार्गावरील उर्वरित कामांसाठी निधी मिळावा याकरिता स्थायी समितीमध्ये ठराव मांडण्यात आला आहे.’’ प्रशासनाकडून बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या मार्गावरील वाहतूक पोलीस आणि वॉर्डनसंख्या वाढविण्यात आली आहे. बीआरटी मार्गात खासगी वाहने घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचबरोबर या मार्गाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जात आहे.बीआरटी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. नगर बीआरटी मार्ग सुरु होण्याआधीपासून आणि आता सुरु झाल्यानंतरही चर्चेचा मुद्दा राहिला आहे. कधी अपघातांमुळे तर कधी त्रुटींमुळे नगर बीआरटी मार्ग चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून बीआरटी मार्गात झालेल्या अपघातांमुळे काही नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून बीआरटी मार्गावरून टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने बीआरटी मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सायरनची योजना राबविण्यात येणार आहे.
बीआरटी मार्गावर वाजणार सायरन
By admin | Published: June 14, 2016 4:48 AM