प्रसाद कानडे
पुणे : दिवस -रात्र आम्ही शेल्टरचा आसरा घेतलाय. वाजणारे सायरन, उरात धडकी भरविणारे बॉम्बहल्ले आणि आजूबाजूला दिसणारा रक्तपात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. सततच्या बॉम्ब वर्षावात आपण सुरक्षित आहोत हिच येथील प्रत्येकाची भावना निर्माण आहे.कोणी मेट्रोच्या स्टेशनचा आसरा घेतलाय तर कुणी कॉलेजच्या हॉस्टेलवर स्वतःला अक्षरश कोंडून घेतल आहे. जीव मुठीत घेतला आहे, पण मनात सुरक्षितपणे मायदेश गाठणे हीच इच्छा आहे. शिवानी लोणकर सारख्या हजारो भारतीय युक्रेन मध्ये अडकून पडलेत.आपल्या सुरक्षेसाठी भारत सरकारला साद घातलीय.
पुण्याची शिवानी लोणकर युक्रेन ची राजधानी असलेल्या किव्ह मध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे. शिवानी म्हणाली, काही दिवसांपूर्वी युक्रेन ची परिस्थिती खूप चांगली होती. मात्र रशियाने दोन दिवसांपासून युद्धाची घोषणा केल्यानंतर परिस्थिती खूप बिघडली आहे. युक्रेनची परिस्थिती शिवानी सांगतेय. सध्याची स्थिती आणीबाणीची आहे. स्थानिक प्रशासन कोणतीच मदत करीत नाही. सायरन वाजताच शेल्टर मध्ये जाण्याच्या सूचना केल्या आहेत. पण शेल्टर मधील परिस्थिती भीषण आहे. पिण्यास देखील पाणी नाही. आम्ही खूप सारे लोक दाटीवाटीने येथे बसलो आहोत. काही भारतीय विद्यार्थी आपआपल्या महाविद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहिल्या आहेत. मी ज्या इमारती मध्ये राहते तेथे तळघरात जाऊन राहत आहे. भारतीय दुतावासाशी संपर्क होईना.
सर्व बाजुंनी सीमारेषांजवळ पोहचणे अवघड
आम्हाला भारतात यायचेच. पण बॉम्ब हल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. पोलंड मार्गे भारतात येण्यासाठी प्रयत्न करतोय. पण सर्व बाजूनी सीमारेषांजवळ पोहचणे अवघड झाले आहे. पोलंडच्या सीमेवर कसं हे देखील माहित नाही. स्थानिक प्रशासन देखील या विषयी काही माहिती देत नाही. भारतीय दूतावासशी संपर्क देखील होत नाही. काय करावे हेच आता सुचत नाही. घरी संपर्क होतो. पण पुन्हा संपर्क होईल की नाही याची देखील खात्री नसल्याची भावना शिवानी ने मांडली.