लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तो बांधकाम व्यवसायात काम करून सर्वसामान्य जीवन जगत होता. त्याच्या बहिणीच्या दिराने एकेदिवशी त्याच्याकडे पिस्तुले ठेवण्यासाठी दिली. बहिणीच्या दिराला पोलिसांनी पकडल्याने हा तरुण घाबरला. आपल्यालाही पोलीस पकडतील, असे त्याला वाटले. बहिणीचा दीर जामिनावर सुटल्यानंतर त्याची पिस्तुले त्याला परत देण्यासाठी या तरुणाला त्याने अप्पर इंदिरानगर येथे बोलावले. ही माहिती पोलिसांना समजली. पिस्तूल घेऊन आलेल्या या तरुणाला पोलिसांनी सापळा लावून पकडले.
रमेश नरसिंग राठोड (वय ३०, रा. मंजाळकर चौक, वडारवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार यांना अप्पर इंदिरानगर येथे एक जण पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अप्पर इंदिरानगर येथील पीएमपीएल आवारात बुधवारी रात्री सापळा रचला. तेथे संशयित तरुण आला असताना पोलिसांनी त्याला पकडले.
रमेश राठोड याच्याकडील पिशवीत २ गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे असा १ लाख २२ हजार रुपयांचा माल मिळाला. राठोड याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो बांधकाम व्यवसायात काम करत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम थांबले होते. त्याच्या बहिणीचा दीर रोहित उर्फ गोपाळ गवळी (रा. दांडेकर पूल) याने त्याच्याकडे ही पिस्तुले ठेवण्यासाठी दिली होती. त्याला काही दिवसांपूर्वी दत्तवाडी पोलिसांनी त्याला पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.
रोहित गवळी हा सोमवारी जामिनावर सुटल्यानंतर त्याने रमेशला पिस्तूल परत देण्यासाठी बोलावले होते. रोहित गवळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर लॉकडाऊनमध्येही पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, सतीश भालेकर यांनी ही कामगिरी केली.