Pune Accident ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या कार अपघातानंतर बरबटलेल्या व्यवस्थेचा नवनवा चेहरा दिवसागणिक उघड होत आहे. अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी राजकीय नेते आणि पोलीस यंत्रणेनं मदत केल्याचा आरोप असतानाच आरोपीच्या रक्तचाचणीतही ससून रुग्णालयात घोळ घातल्याची बाब नुकतीच उघड झाली. मात्र या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी ज्या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे, त्या पथकाच्या अध्यक्षावरच यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचं आता समोर आलं आहे.
अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची चाचणी करण्यात आल्यानंतर घेतलेले नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. अपघातानंतर ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र डॉ. सापळे यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत.
काय आहेत आरोप?
डॉ. पल्लवी सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी १३ लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितल्याचा आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आहे. तसंच त्या वापरत असलेल्या वाहनाच्या बिलाबाबत बनवाबनवी केल्याचे आरोप आहेत. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे.
ससून रुग्णालयातील डॉक्टरवर कारवाई
आरोपीच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर या दोघांना रविवारी रात्री उशिरा अटक केली. डॉ. अजय तावरे यांनी फोन करुन रक्ताचे नमुदे बदल्याची सूचना श्रीहरी हाळनोर यांना दिली होती. त्यामुळे डॉक्टरांनी आरोपीच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठवून प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आणि दोघांना अटक करण्यात आली.