पुणे : दहावीचा निकाल लागून महिना झाला. अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ ऑगस्टला कॉलेज सुरू होईल, असे वाटत होते. मात्र आता कॉलेजची सुरुवात पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘घरात बसून कंटाळलो बाबा’ असा सूर कॉलेजमध्ये पाऊल टाकण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भावी कॉलेजकुमारांमधून व्यक्त होत आहे.
सीबीएसई निकाल लागल्यानंतरच पुढील सोपस्कार पूर्ण होणार आहेत. याबद्दल पालक आणि पाल्यांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. शिक्षण विभागाकडून नव्याने वेळापत्रक काढून प्रक्रिया राबवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. नुकताच आयसीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. आता विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. वेळापत्रकाच्या निर्देशानुसार दहावीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीत दाखल केले आहेत.
शाळांना, विद्यार्थ्यांनाही प्रतीक्षा
आधीच कोरोना महामारीमुळे घरात बसून मुलांनी ऑनलाइन शिक्षण घेतले. आता कॉलेजमध्ये नव्याने पाऊल टाकायला मिळणार म्हणून नव्याने अकरावीचा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. मात्र सीबीएसईचा निकाल लांबला आणि हा निकाल लागल्याशिवाय प्रवेशप्रक्रिया थांबवावी, अशा सूचना आल्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया थांबली आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शहरात ३० ते ३५ शाळा सीबीएसई माध्यमाच्या आहेत. या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थीही निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
''दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल १७ जूनला जाहीर झाला. त्यानंतर सर्व शाखांसाठी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले. विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सीबीएसईचा निकाल जाहीर होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. - प्रदीप कदम, प्राचार्य, कॉन्क्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड कॉम्प्युटर स्टडीज, चिखली''''माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागून महिना लोटला. इयत्ता अकरावीसाठी प्रवेशप्रक्रियाही राबविली गेली. मात्र सीबीएसई परीक्षेचा निकाल न लागल्यामुळे ही प्रक्रिया थांबली आहे. हा निकाल केव्हा लागणार आणि प्रत्यक्ष कॉलेज केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा नव्याने इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लागली आहे. - विनोद नाईक, विद्यार्थी''