पुरंदर तालुक्यात आज १७४० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात, तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या ही दररोज वाढत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असल्याने मागणी ही वाढली आहे. अनेकदा ऑक्सिजनअभावी रुग्णांना जीव गमवावा लागण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने रुग्णांबरोबरच नातेवाईकांसमोर मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. जेजुरी औद्योगिक वसाहतीत के-चंद्रा इंजिनिअरिंग प्रा. लि. ही ऑक्सिजनची निर्मिती करणारी कंपनी आहे. येथून पुरंदर व पुरंदर बाहेरही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांत पुरंदर तालुक्यात ऑक्सिजनचा एवढा तुटवडा निर्माण झाला आहे की, प्रशासनाबरोबरच रुग्णांचे नातेवाईक, हॉस्पिटलचे डॉक्टर्स हतबल झाले आहेत. यामुळे जेजुरीचे नगरसेवक अजिंक्य देशमुख, सुशील राऊत, माजी नगरसेवक भारत शेरे, प्रसाद वासकर, अलिम बागवान आदी कार्यकर्त्यांनी जेजुरी औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या कंपनीत जाऊन ठिय्या मांडला होता. कंपनीतून पुरंदरच्या बाहेर जाणाऱ्या ऑक्सिजनच्या गाड्या भरण्यापूर्वी पुरंदर तालुक्यातील मागणीनुसार ऑक्सिजनची पूर्तता प्राधान्याने करावी अशी आग्रही मागणी करीत कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या वेळी या ठिकाणी पुरंदरच्या मागणीचा प्रस्ताव घेऊन नायब तहसीलदार उत्तम बढे, मंडलाधिकारी गोपाळ लाखे, तलाठी देवकरही आले होते. पुरंदर तालुक्यासाठी दिवसाला ४५० ऑक्सिजन टाक्यांची मागणी असल्याचे नायब तहसीलदार यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कंपनीने पहाटे तीन वाजेपर्यंत पुरंदर तालुक्यातील मागणीचा पुरवठा झाल्यावरच कार्यकर्ते येथून हटले.
कंपनीचे मुख्य व्यवस्थापक योगेंद्र चौधरी यांनी कंपनीतून दररोज ८०० ऑक्सिजन टाक्यांची निर्मिती होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत कंपनीला चाकण येथून येणारा लिक्विड ऑक्सिजन न आल्याने ऑक्सिजनच्या निर्मितीत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता ती अडचण राहिली नसून ऑक्सिजनचा तुटवडा भासू देणार नाही. त्याचबरोबर नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्री आलेली असून १५ दिवसांत तो विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
ऑक्सिजन निर्मिती करणारी के. चंद्रा कंपनी.