पुणे: शहराच्या पूर्व भागातील ५९ विभाग प्रशासनाने रेडझोन म्हणून जाहीर केले असून तिथली टाळेबंदी अजून कायम ठेवली आहे. या भागातील नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील, तिथली स्वच्छतागृहे रोज तीन वेळा स्वच्छ केली जातील असे प्रशासन सांगत असले तरी हे सांगणे म्हणजे बोलाचाच भात व बोलाचीच कढी असल्याचे या परिसरात फिरताना जाणवते.पत्रे लावून पेठांचे रस्ते बंद केलेले असले तरी आतमध्ये नागरिकांना सर्वच गोष्टींसाठी झगडावे लागते आहे.सार्वजनिक स्वच्छतागृहे ही या भागातील बहुतांश नागरिकांची रोजची आवश्यक गरज आहे, मात्र त्याची स्वच्छता फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यातही टिंबर मार्केट, पुढे भवानी पेठ, गवरी आळी, काची गल्ली, ढोर गल्ली, नाना पेठ, दुसर्या बाजूला स्वारगेट, सारसबाग, हिराबाग, लोकमान्य नगर व सर्वात महत्वाचे म्हणजे लोहियानगर सारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात ही स्वच्छता नावालाच दिसते आहे.शहरात एकूण १२४० सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यातली १५८ या कंटेन्मेंट परिसरात येतात. त्यांच्या प्रत्येक आरोग्यकोठीला स्वच्छतागृहांच्या साफसफाईसाठी सफाई कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून ही स्वच्छता होणे अपेक्षित आहे. दिवसातून ५ वेळा ही स्वच्छता होते, त्यासाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचारी आहेत, त्यांना सर्व साधने दिली आहेत, स्वच्छता करतानाची छायाचित्र वरिष्ठांच्या मोबाईलवर नियमितपणे पोस्ट करणे त्यांना बंधनकारक केले आहे असे पालिकेच्या घनकचरा विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्वर मोळक सांगतात. मात्र गुरूवार पेठ, रविवार पेठ, बोहरी आळी, लोहियानगर, स्वारगेट, भवानीपेठ इथे अशी स्वच्छता अभावानेच दिसते आहे. लोकसंख्येमुळे व स्वतंत्र अशी काहीच व्यवस्था नसल्याने वापर मोठ्या प्रमाणावर व त्या तुलनेत स्वच्छता कमी अशीच अवस्था आहे. अनेक ठिकाणी दुपारनंतर तर कधीच स्वच्छता कर्मचारी येत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.जीवनावश्यक वस्तू सहज मिळतील हेही या भागासाठी असेच वार्यावरचे आश्वासन ठरले आहे. रेशनिंग वर धान्य फुकट मिळते आहे, मात्र ते देण्याची व्यवस्था ना दुकानदाराने केली आहे ना प्रशासनाने! सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडेच शिधापत्रिका दाखवून हे धान्य घ्यावे लागते. अनेक दुकानदारांकडे क्षमतेपेक्षा जास्त कार्ड आहेत. त्यामुळे माल आल्याची फक्त माहिती कळाली तरी त्यांच्याकडे झुंबड ऊडते. टाळेबंदीने व्यवसाय थांबला, शिल्लक पैसा संपला, त्यामुळे आता या धान्यावर गुजारा करणे किंवा जेवण वाटले जाते तिथे गर्दी करणे याशिवाय इथल्या अनेक कुटुंबांकडे दुसरा पर्यायच राहिलेला नाही. त्यामुळे घरातील बायकापोरांसह सगळेच गर्दी करून काहीतरी मिळवण्याच्या धडपडीत असतात. त्यांना कमाईसाठी बाहेर पडायचे आहे. मात्र, त्यावरच बंदी घालण्यात आली आहे. काही करायचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या काठ्या खाव्या लागत आहेत.या सर्वच भागातील नागरिकांची सहनशीलता आता संपत चालली आहे. साहेब लोक हुकूम देतात, तो कागदावर दिसतोही, पण प्रत्यक्षात मात्र तिथे यंत्रणा नावाचा प्रकार काही दिसायला तयार नाही. बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असा हा प्रकार आहे. त्यातच कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण याच परिसरात सापडत असल्याने परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे.------प्रशासनाने स्थानिक नगरसेवक, चारदोन प्रतिष्ठित नागरिक यांना विश्वासात घेऊन या भागातील रणनीती ठरवायला हवी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. इथे वास्तव.काय आहे याची काडीचीही माहिती नसलेले लोक या भागाबाबत निर्णय घेत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत दुकानांची संख्या कमी आहे हे माहिती असलेला कोणीही माणूस दुकाने फक्त दोन तास खुली राहतील असा निर्णय घेणारच नाही.अविनाश बागवे,नगरसेवक-----प्रशासन काम करते आहे, मात्र आता तेही वैतागले आहेत. अधिकार्यांच्या निर्णयात एकवाक्यता नाही, परिस्थितीचा अभ्यास नाही.त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. आता पत्रे लावून गल्लीबोळातील रस्ते बंद करून टाकले आहेत. ते करताना आतील नागरिक राहणार कसे याचा काहीच विचार झालेला नाही. त्यांना जगण्यासाठी किमान.काही गोष्टी लागतील त्या मिळणार कशा याचे ऊत्तर नाही.विशाल धनवडे, नगरसेवक----स्वच्छतागृहांची साफसफाई नियमितपणे करण्याबाबत आरोग्यकोठी प्रमुखांना कळवण्यात आले आहे. वापराचे प्रमाण फार असल्याने ती लवकर खराब होतात. तक्रार आल्यास त्याची त्वरीत दखल घेतली जाते.ज्ञानेश्वर मोळक,सह आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका
पुण्यातील ‘कंटेन्मेंट’परिसरातील स्थिती म्हणजे ‘बोलाचीच कढी, बोलाचाच भात’....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2020 4:53 PM
नागरिकांचा रोजच्या खाण्यापिण्यासाठी आटापिटा..
ठळक मुद्देकोरोनाचे सर्वाधिक रूग्ण याच परिसरात सापडत असल्याने परिस्थिती अधिकच अवघड या सर्वच भागातील नागरिकांची सहनशीलता चालली आता संपत