पुणे : शहरामध्ये कोरोना विषाणूने थैमान मांडले असून रुग्णांची संख्या साडेतीन लाखांवर गेली आहे. सहा हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व आकडेवारी पाहता पुण्यामध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. याला सत्ताधारी भाजप आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केला आहे.
सत्ताधारी आणि प्रशासनाने दुसरी लाट गांभीर्याने घेतलेली नाही. राज्य सरकारला जबाबदार धरून बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे. रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात अपयश आले आहे. सर्व विरोधी पक्ष या आपत्तीचे भान ठेवून राजकारण न करता संकटाच्या काळामध्ये सोबत राहिलो. परंतु, राज्य सरकारवर बिनबुडाचे आरोप करणार असाल तर आम्ही सुध्दा जशास तसे उत्तर आगामी काळात देऊ, असा इशारा शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिला आहे.
मागील तीन महिन्यांत वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने हालचाली केल्या नाहीत. पालिकेचा आपत्कालीन कक्ष फक्त नावालाच आहे. खोटी व चुकीची माहिती दिली जाते.