पुणे : जिल्हा परिषदेने घेतलेल्या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील तब्बल 6 लाख 42 हजार 86 महिलांना नव-याच्या मालमत्तेत हक्क मिळाला आहे. अद्यापही 40 टक्के घरांमध्ये महिलांना त्याचा हक्क दिला नसून, शिल्लक कुटुंबांनी ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महाफेरफार अभियानांतर्गत मिळकत पत्रिकेवर (आठ-अ) महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी खास शिबिरांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या आवाहनाला अनेक घरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्वामित्व योजनेंतर्गत घरातील गृहिणींला मालमत्तेची मालकी हा सक्षमीकरणाचा महत्त्वाचा भाग असून, यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना सूचना देऊन त्यांच्या हद्दीतील मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतींनी मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे लावण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये मिळकत पत्रिका किंवा आठ-अ यांचे वितरण, त्यावर महिलांचे नाव देणे, आठ-अमध्ये महिलांची नावे समाविष्ट करण्यासाठी अर्ज घेणे प्रक्रियेला वेळ लागत असला तरी चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आठ अ मिळकतीची एकूण संख्या 10 लाख 11 हजार ऐवढी असून, त्यापैकी आतापर्यंत 6 लाख 42 हजार 86 आठ अ वर महिलांची नावे समाविष्ट झाली आहेत. शिल्लक कुटुंबांनी देखील त्वरीत पुढाकार घेऊन मिळकतीमध्ये महिलांची नावे समाविष्ट करावी, असे आवाहन आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ अ मध्ये महिलांची नावे समाविष्ट झालेली तालुकानिहाय संख्या
जुन्नर- 77085, आंबेगाव- 39887, खेड- 66640, शिरूर- 66438, मुळशी - 40679, मावळ - 52223, हवेली - 53907, दौंड- 58221, वेल्हा - 15761, पुरंदर- 37231, बारामती - 47837, इंदापूर- 54257, भोर - 31920, एकूण : 642086