लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कृषी विभागाने विकसित केलेल्या डीबीटी पोर्टलचा शेतकऱ्यांकडून चांगला वापर होत असून ,रब्बी हंगामातील अनुदानित बियाणांसाठी राज्यातून या पोर्टलवर तब्बल ६ लाख ४३ हजार शेतकऱ्यांनी मागणी नोंदवली आहे.
त्यात हरभऱ्याला सर्वाधिक मागणी आहे. या मागणीनुसार यंदा दीड लाख क्विंटल हरभरा बियाणांचे वाटप करावे लागणार आहे. त्या खालोखाल रब्बीतील गहू, ज्वारी यासाठीच्या बियाणांची मागणी पोर्टलवर नोंदली गेली आहे.
सरकारकडून दिले जाणारे हे बियाणे अनुदानित आहे. ते प्रमाणित म्हणजे वापरून सिद्ध केलेले असते. एकूण किमतीच्या ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते. कमाल दोन हेक्टरपर्यंत हे अनुदानित बियाणे मिळते. उत्पादन जास्त व दर्जेदार येत असल्याने शेतकऱ्यांकडून दरवर्षी याला चांगली मागणी असते.
राज्याच्या मराठवाडा व विदर्भ या भागातून जास्त मागणी झाली आहे. त्यातही मराठवाड्यातील लातूर विभाग व विदर्भातील अमरावती विभागातून जास्त अर्ज आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. पोर्टलवर मागणी नोंदवल्यानंतर आता त्याची छाननी होऊन अर्जदारांना टोकन व वितरकाचे नाव कळवले जाईल. तिथून त्यांना अनुदानित बियाणे मिळेल. सप्टेंबरच्या मध्यापासून रब्बी हंगाम सुरू होतो. खरिपातील पिकांची काढणी संपतानाच शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतात. त्यामुळे वितरकांना बियाणांचा पुरेसा साठा ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, त्याची खातरजमाही करण्यात येत आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
भातपिकाची काढणी झाल्यावर त्या जमिनीत हरभरा व अन्य कडधान्ये घेण्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढावे, यासाठी अशा क्षेत्रातील कडधान्य बियाणांच्या मागणीला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
---//
----------------------------
हरभऱ्यामध्ये फुले विक्रम व आरव्हीजी २०२ या वाणाला शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अनुदानित बियाणे देताना या वाणांचा प्रामुख्याने विचार करण्याचा प्रयत्न असेल.
- शिवकुमार सदाफुले, कृषी उपसंचालक, कृषी विभाग.