पुणे : खेड तालुक्यात काही दिवसांपूर्वी लाळ - खुरकत आजाराने जवळपास ६ जनावरे दगावली. जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी तक्रार केली होती. औषधांची गरज असतानाही ती खरेदी न केल्याने जनावरे दगावल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर पशुसंवर्धन विभागाला जाग येऊन त्यांनी तातडीची औषध खरेदी करून ती तालुक्यात वाटली आहे.
खेड तालुक्यात खरपुडी व रेटवडी परिसरात लाळ्या-खुरकत आजाराने जनावरे दगावली होती. ६ गाई व १ शेळीचा या आजाराने मृत्यू झाला. तसेच अजूनही काही जनावरांना लागण होत असल्याने शेतकरी भयभित झाले आहे. या आजारामुळे रक्त, लघवी तपासणीतून विविध व्हायरल इन्फेक्शन होत आहे. रोगाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे. जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी हा विषय स्थायी समितीत मांडला होता. मात्र, याबाबत दखल घेतली नव्हती. जनावरांना देण्यासाठी अनेक औषधे पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे सहा महिन्यांपासून उपलब्ध नव्हती. मात्र, तक्रारी करूनही औषधे दिली गेली नव्हती. लाळ्या-खुरकत रोगाने जनावरे दगावल्यानंतर औषध खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला जाग आली. रविवारी तातडीने अँटिबाडी, पेनकिलरसारखी औषधांची खरेदी करण्यात आली आणि ती तालुक्यांना वाटण्यात आली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना करण्याची गरज
पशुसंवर्धन विभागाकडे गेल्या सहा महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. याबाबत स्थायी समिती वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. लाळ्या-खुरकतमुळे जिल्ह्यात अनेक जनावरे दगावली आहे. त्यात कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना या आजारामुळे पशुधन संकटात आले आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.