लोकमत न्यूज नेटवर्कअवसरी : वडिलांची उणीव आईने तर मुलाची उणीव मुलींनी भरून काढली. अवसरी येथील कौशल्याबाई दत्तात्रय हिंगे (वय ६२) यांचे गुरुवारी निधन झाले. भावाची उणीव जाणवू न देता सहाही मुलींनी आई कौशल्याबाई यांना अग्नी दिला. कौशल्याबाई यांच्या निधनाने अवसरी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अवसरी बुद्रुक गावात कौशल्याबाई यांचे छोटेसे घर आहे. त्यांचे पती दत्तात्रय चिमाजी हिंगे यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या सहा मुलींची पालनपोषण व शिक्षणाची जबाबदारी आई कौशल्याबाई यांच्यावर आली. कौशल्याबाई दुसऱ्याच्या बांधावर बाराही महिने जाऊन मुलींना लहानाचे मोठे करून उच्चशिक्षित केले. सहापैकी वनिता संदीप शिंगोटे इंजिनिअर, मनीषा मारुती देशमुख शिक्षिका, संगीता मंगेश जाधव बीएस्सी, रेश्मा सतीश जााधव बी. कॉम., शीतल दत्तात्रय हिंगे बी. कॉम., स्मिता सतीश वाघचौरे या सहाही मुलींना उच्चशिक्षित करून पाच मुलींचे लग्न केले. आई कौशल्याबाई गेल्या पाच वर्षांपासून आजारी असल्याने आईचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी शीतलवर होती. दवाखान्यासाठी लागणारा सर्व खर्च पाच मुली पाच वर्षे करीत होत्या. मात्र गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. रात्री १० वाजता भावाची उणीव न दाखवता सर्व सहाही मुलींनी आई कौशल्याबाई यांना शेवटचा अग्नी दिला.
सहा मुलींनी दिला आईला अग्नी
By admin | Published: May 13, 2017 4:25 AM