पुणे : केंद्र सरकारने स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या चार तसेच राज्यसभेच्या दोन अशा सहा खासदारांनी २०१९-२०२४ या पाच वर्षांत सुमारे १०९ कोटी खर्च केला आहे. पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांना २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी ११ कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून तो खर्च करण्यात आला आहे. मात्र, बापट यांच्या निधनामुळे त्यापैकी ६८ लाख रुपयांचा खर्च हा अद्याप अखर्चित राहिला आहे.
आमदारांप्रमाणे केंद्राकडून खासदारांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत काही निधी उपलब्ध करून देण्यात येतो. स्थानिक भागातील प्रत्येक घटकांच्या गरजा लक्षात घेता हा निधी खर्च करण्याची शिफारस किंवा त्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित खासदारांकडून केंद्र सरकारला करण्यात येते. त्यानुसार, प्रत्येक खासदाराला ठराविक असा निधी उपलब्ध करण्यात आला. त्यापैकी लोकसभेच्या खासदारांना सुमारे १७ कोटी रुपयांपर्यंत निधी वर्षाला उपलब्ध करण्यात येतो, तर राज्यसभेच्या खासदारांना सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने २०२०-२१ या काळात खासदारांना देण्यात येणारा स्थानिक विकास निधी स्थगित केला होता. तसेच २०२१-२२ या वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे केंद्र सरकारने २०२३-२४ या वर्षासाठीचा त्यांचा निधी उपलब्ध केला नाही. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात १२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यापैकी ११ कोटी ४२ लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मान्यता मिळून तो खर्च करण्यात आला आहे. मात्र, त्यापैकी ६८ लाख रुपयांचा खर्च हा अद्याप बापट यांच्या निधनामुळे अखर्चित राहिला आहे.
बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी १६ कोटी ८५ लाख, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी १६ कोटी ९० लाख तर मावळमधून श्रीरंग बारणे यांनी १६ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी त्यांच्या मतदार संघामध्ये विकासकामांसाठी खर्च केला आहे. त्याशिवाय राज्यसभेचे खासदार जावडेकर यांनी २३ कोटी ४० लाख तर वंदना चव्हाण यांनी २३ कोटी १० लाख रुपयांचा निधी खर्च केला. जिल्ह्यातील सहा खासदारांनी पुणे शहरासह जिल्ह्यासाठी उपलब्ध ११० कोटींपैकी १०८ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी खर्च केला आहे.