पुणे : गेल्या काही वर्षांत तरुणाईमध्ये ‘सिक्स पॅक,’ ‘एठ पॅक’ची क्रेझ निर्माण झाली असून त्यासाठी ‘जिम’कुशल प्रशिक्षक असणे गरजेचे आहे. तसेच आरोग्याची काळजी योग्य प्रकारे कशी घ्यावी, याबाबत अचूक माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून सल्ला घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिकशास्त्र विभागाने जिम मॅनेजमेंट व जिम इन्स्ट्रक्टर हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असून त्यास व्यायामाची आवड असणाऱ्या व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकांना आपल्या शरीराकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात ‘जिम इंडस्ट्री’ जोर धरू लागली आहे. त्यातही प्रामुख्याने तरुणाईचे ‘जिम’ला जाण्याचे फॅड वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरातील विविध भागात आधुनिक व्यायाम साहित्य असणाºया सुसज्ज जिम सुरू झाल्या आहेत. कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे आहे. त्यामुळे अवाच्या सवा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. परंतु, जिमचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि जिम सुरळीतपणे चालवण्यासाठी कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळेच विद्यापीठाने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्षातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन हा अभ्यासक्रम विभागाला चालवावा लागत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक विद्यार्थी विभागातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. विद्यापीठाच्या शारीरिकशास्त्र विभागातर्फे ‘जिम इन्स्ट्रक्टर’ व ‘जिम मॅनेजमेंट’ हे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिकवले जातात. बारावी उत्तीर्ण किंवा बारावीस समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमास १८ ते ६० वय असणाऱ्या व्यक्तींना प्रवेश दिला जातो. तसेच तीन महिन्यांच्या या अभ्यासक्रमास केवळ ५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देऊन मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आवश्यक प्रशिक्षण देण्यात येते. प्रामुख्याने आयटी, बँकिंग क्षेत्रातील किंवा केवळ कार्यालयात बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वजन वाढणे, दम लागणे, पोट सुटणे, सांधेदुखी आदी आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बहुतांश कर्मचारी ‘जिम’च्या पर्यायाचा विचार करून दररोज व्यायामाला जाण्याचे नियोजन करतात. परंतु, प्रत्येकाला दररोज व्यायामाला जाणे शक्य होत नाही. अलीकडच्या काळात तरुणांबरोबरच जिमला जाणाऱ्या तरुणींची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुरुष इन्स्ट्रक्टरबरोबरच आता जिममध्ये महिला इन्स्ट्रक्टर असल्याचे पाहायला मिळते, असे शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील अधिकाºयांनी सांगितले........विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातर्फे जिम मॅनेजमेंट आणि जिम इन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जात आहे. त्यात व्यायामाचे प्रकार, आहारशास्त्र, व्यायामशाळेचे व्यवस्थापन व शारीरिक क्षमता याबाबत मार्गदर्शन केले जाते. - डॉ. दीपक माने, शारीरिक शिक्षणशास्त्र विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तरुणाईत ‘सिक्स पॅक’ची वाढतेय क्रेझ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 1:32 PM
कमी कालावधीत तरुणाईला पिळदार शरीर हवे आहे. त्यामुळे अवाच्या सवा शुल्क भरून पहाटे व रात्री उशिरापर्यंत जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ‘जिम इन्स्ट्रक्टर’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम