इंदापूर : एटीएम, बँक अथवा दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ६ जणांना इंदापूर पोलिसांनी जेरबंद केले. शनिवारी (दि. २२) पहाटे अडीचच्या सुमारास पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावाच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. नवनाथ ज्ञानदेव पवार, योगेश अशोक पवार, रामेश्वर सोमनाथ पवार, लक्ष्मण मारुती गोडगे, तानाजी धर्मराज गोडगे (सर्व रा. सुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), दयाराम रामा भोई (रा. पळसदेव, ता. इंदापूर) यांच्यासह फरार झालेल्या एका अनोळखी युवकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. टाटा एसी (एमएच ४५-टी २६४८), दुचाकी (एमएच ४५-जे ८३२७) या वाहनांसह एक आॅक्सिजन बॉटल वायर गन रेग्युलेटर, गॅसकटर, गॅस टाकी, दोन हातोडे, एक कटावणी, पक्कड, बॅटरी, दोरी, दोन कटावण्या, सहा मोबाईल आदी वस्तू पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केल्या आहेत.पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल ननवरे, हवालदार शिरीष लोंढे, पोलीस नाईक संतोष लोंढे, विनोद पवार, जगदीश चौधर, बापू मोहिते यांनी ही कारवाई केली. हवालदार शिरीष लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.काल मध्यरात्रीनंतर पोलीस गस्त सुरू असताना दीडच्या सुमारास पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी, पळसदेव गावाच्या हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एका बंद दुकानासमोर चारचाकी वाहन थांबले असून त्यांच्याजवळ दुचाकी व अंधारात ६ ते ७ जण संशयास्पद स्थितीत उभारल्याची माहिती फौजदार अमोल ननवरे यांना दिली. ती मिळताच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयितांना पकडले. त्यांपैकी एक जण पळून गेला. चौकशी करताना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. दरोडा घालण्याचे साहित्य मिळाले; त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष साहित्य जप्त करण्यात आले. (वार्ताहर)
दरोड्याच्या तयारीतील सहा जणांना अटक
By admin | Published: October 23, 2016 3:42 AM