पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असतानाच, पुणे शहरातील कोरोनाबाधितांची ही वाढ आटोक्यात आल्याचे आशादाची चित्र पाहण्यास मिळाले. पुणे शहरात ३ एप्रिलपासून दहा-वीस रूग्णांची नित्याने होणारी ही वाढ आज ७ वर आली आहे. मात्र मृत्यूचे सत्र अद्यापही थांबले नसून, आज नव्याने ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पावलेले हे सहा रूग्ण अन्य आजारानेही ग्रस्त होते. पुणे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत ज्या २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बहुतांशी जणांचे वय हे ५५ च्या पुढील असून, ते अन्य आजारांनेही ग्रासलेले होते. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सहा वाजेपर्यंत कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील एकूण संख्या २१० झाली असून, यामध्ये पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १७६ इतकी आहे. यामध्ये नायडू हॉस्पिटलमधील १०५ रूग्णांसह शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील १३७ रूग्ण व ससून हॉस्पिटलधील ३९ रूग्णांचा समावेश आहे़. तर ग्रामीण भागातील १२ व पिंपरी-चिंचवडमधील २२ रूगणांचा यात समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ही २४ असून, यामध्ये ससून हॉस्पिटलमधील १६ जणांचा, जिल्हा रूग्णालयातील एकाचा, खाजगी हॉस्पिटलमधील ६ जणांचा तर नायडू हॉस्पिटलमधील १ कोरोनाबाधित रूग्णाचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये सहा रूग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, १ बारामतीमधील रहिवाशी आहे. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमधील ४२ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रूग्णास श्वसन संस्थेतील जंतूसंसर्ग, अल्कोहोलीक लिवर व मधूमेहाचा विकार होता. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व पुण्यातील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय कोरोनाबाधीत महिला रूग्णाचा मृत्यू झाला़ सदर महिला निमोनिआ व किडनी विकाराने त्रस्त होती. तसेच ससून हॉस्पिटलमध्येच उपचार घेत असलेल्या बारामती येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधिताचा पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला असून त्यासही निमोनिआ विकार होता. नोबल हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या ६२ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रूग्णालाही निमोनिआ, मधुमेह होता तसेच त्याचे बहु अवयव निकामी झाले होते. जहांगिर हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या ६२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेला मधूमेह व अल्सरचा त्रास होता़ तर ससूनमध्ये मृत्यू झालेल्या अन्य ५८ वर्षीय रूग्णास निमोनिआ व श्वसन विकार होता. सद्यस्थितीला सह्याद्री हॉस्पिटलमधील एका रूग्णाची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान नायडू हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटलमधून आजपर्यंत १८ जण उपचाराअंती पूर्ण बरे होऊन घरीही गेले आहेत.
पुणे शहरासह जिल्ह्यात गुरूवारी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत २४ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 8:48 PM
शहरातील कोरोनाबाधितांची वाढ आटोक्यात ससूनसह शहरातील रूग्ण संख्या १७६
ठळक मुद्देपुणे शहरातील कोरोनाबाधितांची ही वाढ आटोक्यात आल्याचे आशादाची चित्र