पुणे: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा गौरवदिनी केली होती. त्यांच्या घोषणेनंतर संस्थेकडून या प्रकल्पाच्या कामाला जोमाने सुरुवात झाली. पण, कोरोनामुळे काही काळ ही प्रक्रिया थांबली होती. पण, आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. ‘भिलार’च्या पुस्तकांचं गावच्या धर्तीवरच सहा प्रादेशिक विभागातील एका गावात लोकसहभागातून पुस्तकांचं गाव उभारण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, औरंगाबाद या प्रादेशिक विभागांमधील प्रत्येकी एका गावात पुस्तकांचे गाव उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णयानंतर लोकसहभागातून नियोजित गावांत पुस्तकांचे गाव उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील भिलार गावात उभारण्यात आलेल्या पुस्तकाच्या गावाला देशविदेशातून हजारो पर्यटकांनी भेट दिली असून, दिवसेंदिवस वाचकांचा प्रतिसाद वाढत आहे. संस्थेचा हा प्रकल्प पूर्णपणे यशस्वी ठरला. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात सहा प्रादेशिक विभागांमधील एका गावात पुस्तकांचे गाव उभारले जाण्याबाबत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.