तळेघर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर कडे बैलघाटाने येणारे उल्हासनगर येथील सहा युवक मुसळधार पडणारा पाऊस व दाट धुक्यामुळे खोल दरी मध्ये अडकले होते. घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांचे कर्मचारी तसेच काही स्थानिक युवक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन करून रात्रीच्या वेळी त्यांना बाहेर काढण्यात यश आले.
मुंबई व उपनगरातील अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्स बैल घाट तसेच शिडी घाट या मार्गे भीमाशंकरला येत असतात. गुगल मॅप वर हा रस्ता अवघा पाच किलो मीटर चा दिसतो मात्र प्रत्यक्षात दाट झाडी व डोंगराचा तीव्र चढ असल्यामुळे खालून वर भीमाशंकरला पोहोचताना खूप वेळ लागतो. अशातच जे पर्यटक उशिरा चढायला सुरुवात करतात ते पर्यटक सायंकाळी पाऊस व धुक्यामुळे रस्ता चुकतात व अडकतात. अशा घटना दरवर्षी घडू लागल्या आहेत. असाच प्रकार मुंबई उल्हासनगर येथील सहा युवकांबाबत झाला आहे.
पवन अरुण प्रताप सिंग (वय २६ वर्ष) (रा.उल्हासनगर) सर्वेश श्रीनिवास जाधव (वय वर्ष २६) निरज रामराज जाधव (वय २८वर्ष) दिनेश धर्मराज यादव (वय २३वर्ष) हितेश श्रीनिवासी यादव (वय २५ वर्ष) अंकुश सत्यप्रकाश तिवारी (वय २३ वर्ष) सर्व राहणार उल्हासनगर ह्या सहा युवकांनी कोकणामधून दुपारी चढायला सुरुवात केली. रस्त्याने मुसळधार पाऊस व दाट धूके होते या वातावरणात सायंकाळी पाच वाजता अंधार पडला यात त्यांना रस्ता दिसेनासा झाला. हे सहा जण घाबरले त्यांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधुन मदतीचे आवाहन केले. या युवकांचा मोबाईल चालू असल्यामुळे त्यावरून त्यांनी आपले गुगल लोकेशन पाठवले. या लोकेशन वरून पोलीस व स्थानिक तरुणांनी अडकलेली दरीची जागा शोधून काढली व त्यांना दोरखंड व इतर साहित्यांच्या आधारे सुरक्षित बाहेर काढले. मुसळधार पाऊस व दाट धुके असल्यामुळे मदत कार्य करण्यास खुप अडचणी येत होत्या अंधारी राञ व त्यामध्येच दाट धुके असल्यामुळे टाॅर्च असुनही समोरचे दिसणे कठीण होत होते. यामध्ये ह्या जंगलामध्ये असणारे भयानक विषारी सर्प अत्यंत अरुंद रस्त्यामध्ये दिसत असल्यामुळे अंगावरती अक्षरश: शहारे येत असल्याचे पोलिस उपनिरिक्षक अनिल चव्हाण यांनी सांगितले. राञी उशिरा पर्यंत सहा युवकांना वरती काढले असता ते अत्यंत भेदरलेल्या अवस्थे मध्ये थरथर कापत होते. तुम्ही आम्हाला देवदुतासारखे भेटला काही क्षणांपुर्वी आमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले होते असे म्हणत पवन प्रताप सिंग ह्यास रडु कोसळले. पोलीस प्रशासन व स्थानिक तरुणांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.