पुणे : पुण्यातील काेथरुड पाेलीस स्टेशनमध्ये एक धक्कादायक घटना समाेर आली आहे. 13 वर्षापूर्वी एका खुनाच्या खटल्याचा निकाल लाकल्यानंतर काेर्टाने पाेलिसांकडे असलेले या केसच्या संदर्भातील सर्व मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले हाेते. परंतु काही कारणांमुळे तत्कालिन पाेलिसांकडून या मुद्देमालातील खुन झालेल्या तरुणाच्या सांगाड्याची विल्हेवाट लावण्याचे राहुन गेले. आता 13 वर्षानंतर जेव्हा मुद्देमाल खाेलीतील सामानाची पाेलीस तपासणी करत हाेते, तेव्हा त्यांच्या दृष्टीस सांगाडे ठेवलेला बाॅक्स पडला आणि सुरुवात झाली एका वेगळ्याच प्रकरणाला.
2002 साली काेथरुड पाेलीस स्टेशनच्या हद्दील एमआयटी महाविद्यालयाच्या मागील टेकडीवर एका 16 वर्षीय निखील रणपिसे नावाच्या तरुणाचा खुन करण्यात आला हाेता. त्याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने पाेलीसांना त्याची ओळख पटवने अवघड जात हाेते. सुरुवातील एका 40 वर्षीय व्यक्तीचा हा मृतदेह असावा असे पाेलिसांना वाटले हाेते. फाॅरेंसिक अहवालानंतर ताे मृतदेह तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. परंतु ताे मृतदेह काेणाचा आहे याचा शाेध लागू शकला नाही. 2004 साली पाेलिसांना हा मृतदेह निखील रणपिसे नावाच्या मुलाचा असल्याचे समजले. त्यांनी त्याच्या कुटुंबियांचा शाेध घेतला. त्यावेळी त्याच्या वडिलांची माहिती मिळाली. निखील हा वाईट संगतीला लागल्याने तसेच ताे सातत्याने घराबाहेर राहत असल्याने ताे हरविल्याची तक्रार त्याच्या वडीलांनी पाेलिसात केली नव्हती. पाेलिसांनी निखीलच्या खुनाच्या संशयावरुन त्याच्या तीन मित्रांना अटक केली. निखील आणि त्याच्या मित्रांनी निखीलच्या नातेवाईकांचे घर लुटले हाेते. परंतु लुटलेल्या मालाच्या वाटणीवरुन भांडणे झाल्याने निखीलचा खुन झाला अशी मांडणी पाेलिसांनी काेर्टात केली हाेती. ही मांडणी केवळ परिस्थितीजन्य पुरावाच्या आधारे असल्याने काेर्टाने ती अमान्य करत आराेपींची 2006 साली मुक्तता केली हाेती. तसेच या प्रकरणातील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश पाेलिसांना दिले हाेते.
दरम्यान गेली 13 वर्षे निखीलचा सांगाडा हा काेथरुड पाेलीस स्टेशनच्या मुद्देमाल खाेलीमध्ये एका बाॅक्समध्ये पडून हाेता पाेलिसांना ताे सापडल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबियांना कळवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत बाेलताना काेथरुड पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षक प्रतिभा जाेशी म्हणाल्या, पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी पाेलीस स्टेशन्सकडे असलेल्या मुद्देमालाचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार आम्ही आमच्या पाेलीस स्टेशनच्या मुद्देमालात लक्ष घातले असता निखीलचे सांगाडे असलेला बाॅक्स अढळून आला. आम्हाला त्या व्यक्तीच्या केवळ अडनावाची माहिती त्या बाॅक्सवरुन मिळाली. एक पथक स्थापन करुन आठवड्यात निखीलच्या वडीलांचा शाेध आम्ही घेतला. त्याच्या वडीलांना याबाबत माहिती दिली. परंतु त्यांची तब्येत बरी नसल्याने तसेच ते वयाेमानामुळे थकले असल्याने अंतिम संस्कारासाठी येऊ शकले नाहीत. निखीलच्या वडीलांच्या परवानगीने तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार निखीलच्या सांगाड्यांवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
दरम्यान निखीलचे सांगाडे असलेल्या बाॅक्सबाबत तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्याने किंवा त्यांची बदली झाली असल्याच्या शक्यतेमुळे हा बाॅक्स पाेलीस स्टेशनमध्येच राहिला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.