नारायणगाव : कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार संपुष्टात आले आहेत. महाविकास आघाडी बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील असून, शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा गरजूंनी फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले.
कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य आणि सोच मल्टिपर्पज सोसायटी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुणे जिल्हा कौशल्य विकास जनजागृती रथाचा शुभारंभ आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शिवजन्मभूमीतून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, सोच संस्थेच्या पल्लवी गांगुर्डे, विकास अधिकारी गौतम जाधव, उद्योजिका महानंदा महाले, राष्ट्रवादी युवकचे गणेश वाजगे, रोहिदास केदारी, हमीद पिंजारी, जुबेर शेख, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रशांत शेटे, राहुल घाडगे, मेहबूब काझी, तालुका समन्वयक प्रा. अशफाक पटेल आदी उपस्थित होते.
आमदार बेनके म्हणाले की , केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताविषयक योजना बेरोजगार व गरजूंपर्यंत पोहोचवून या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या संकल्पनेतून महाविकास आघाडीने सुरू केलेली जनजागृती मोहीम तळागाळापर्यंत पोहोचवून कौशल्य विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे आ. बेनके यांनी सांगितले.
सोच संस्थेच्या सचिव पल्लवी गांगुर्डे यांनी कौशल्य विकास विभागामार्फेत रोजगार मिळवण्यासाठी शासनाच्या www.mahaswayam.gpv.in या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच ०८०४६८७८३८१ या टोल फ्री नंबरवर मिसकाॅल देऊन आलेल्या मेसेजमधील लिंकवर क्लिक करुन अर्ज ऑनलाईन भरावा अशी माहिती दिली.
यावेळी अनिल तात्या मेहेर, व्ही. नामदेव, मेहबूब काझी यांची भाषणे झाली. ही जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी जि.प. सदस्य पांडुरंग पवार, जि.प सदस्य मोहित ढमाले, गटनेते फिरोज पठाण, नगरसेवक भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शादभाई आतार, सरपंच योगेश बाबू पाटे, सरपंच किशोर घोडे, उपसरपंच प्रेमानंद आस्वार,उपसरपंच विजय कुऱ्हाडे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सादिक आतार, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुरज वाजगे, माजी उपसरपंच नजीर चौगुले, रईस मनियार, बाळासाहेब सदाकाळ, जयसिंग औटी, प्रशांत औटी, रईस चौगुले, प्रसाद पानसरे यांनी विशेष प्रयत्न केले व शुभेच्छा दिल्या.
२१नारायणगाव
पुणे जिल्हा कौशल्य विकास जनजागृती रथाचा शुभारंभ आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला .