पुणे : दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी त्यांना रोजगार देणे आवश्यक असल्याने त्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुणे महानगरपालिका, जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्हा स्वयंरोजगार अधिकार्यांच्या मदतीने कल चाचणीही घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून शासकीय योजनांपासून एकही दिव्यांग शिल्लक राहू नये यासाठी खबदारी घेण्यात येत आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या मतदार संघातील दिव्यांगांचा मेळावा घेण्यात येणार आहे. योजनांसाठी पात्र असलेल्या २ हजार ७०० दिव्यांगांची पडताळणी पूर्ण झाली असून यामध्ये आणखी दिड हजार दिव्यांगांची वाढ होणार असल्याचे राव यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिव्यांगांचे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये दिव्यांगांच्या साहित्याच्या गरजांची निश्चिती केली जाणार आहे. त्यांना लागणार्या सायकल्स, कुबड्या आदी साहित्याची यादी करुन ती शासनाला पाठविली जाणार आहे. हे साहित्य तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीदरम्यान दिव्यांगांना कौशल्याधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा स्वयंरोजगार अधिकारी आणि पुणे महानगरपालिकेची मदत घेतली जाणार आहे. चार हजार दिव्यांगांपैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगांना रोजगार आणि स्वावलंबनाचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. १८ ते २५ वयोगटातील दिव्यांगांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असून ७ वीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. एक ते सहा आठवड्यांचे कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर दिव्यांगांना केंद्रिय समाजकल्याण आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते साहित्य तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्रक यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर दिव्यांगांचा रोजगार मेळावा घेतला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या मदतीने घेतल्या जाणार्या या मेळाव्याला एमआयडीसीतील कंपन्या, खासगी कंपन्या आणि आस्थापनांना आमंत्रित केले जाणार आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणामधून नोकर्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले.
दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण; जिल्हाधिकारी सौरभ राव यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:54 PM
दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी त्यांना रोजगार देणे आवश्यक असल्याने त्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.
ठळक मुद्देजिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा स्वयंरोजगार अधिकारी, पुणे महानगरपालिकेची घेतली जाणार मदतदिव्यांगांसाठी असलेल्या तीन टक्के आरक्षणामधून नोकर्या मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न