खडकी - पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे, रवी बोजवारे या दोन युवकांनी बोर्डाविरोधात तक्रार करीत नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाचे अधिकारी झाड कोणी कापले हे कबूल करीत नसून, एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खडकीत रहदारी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. त्या तुलनेत झाडांचे पुनर्रोपण होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हे प्रकार वेळीच थांबणे आवश्यक आहे. मात्र संबंधित यंत्रणांकडून आणि सामाजिक संस्था आणि संघटनांकडूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड करण्याबाबत त्यांच्याकडून आवाहनही करण्यात येते. मात्र संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.खडकीतील एक तरुण या विरोधात खडकी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, याबाबत पोलीस चौकीत अर्ज करा, असे पोलिसांनी त्याला सांगितले. याबाबत खडकीतील शिवराज प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मदन गाडे म्हणाले, ‘‘वृक्षसंवर्धन व जतन कायद्यानुसार वृक्ष तोडताना वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. एक झाड कापण्यापूर्वी त्या बदल्यात तीन झाडे लावणे गरजेचे असते. परंतु बोर्डाचे अधिकारी याबाबत उदासीन दिसून येतात.’’बोर्डाचे आरोग्य आणि उद्यान विभागाचे अधीक्षक भारत नाईक यांनी सांगितले, ‘‘झाडे कापण्याची रीतसर परवानगी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांच्याकडून घेऊनच झाडे कापली आहेत.’’आरोग्य निरीक्षक राजेंद्र वाईकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘मला काही माहीत नाही. मी त्या ठिकाणी सहज काय चालले आहे हे बघण्यासाठी गेलो होतो. तुम्ही संत किंवा वरंदानी यांना विचारा. माझा त्या गोष्टीशी काहीएक संबंध नाही.’’बोर्डाचे मुख्य अभियंता प्रेम वरंदानी यांनी याबाबत सांगितले, ‘‘माझा काहीही संबंध नाही.’’नागरीकरणाचा पर्यावरणाला फटका- खडकीतील रहदारीसह नागरीकरणही झपाट्याने वाढले आहे. नागरिकरणामुळे झाडांची कत्तल होऊन त्याचा पर्यावरणाला फटका बसत आहे. त्या तुलनेत वृक्षारोपण होताना दिसत नाही. झाडांचे पुनर्रोपण केले नाही म्हणून संबंधितांवर कारवाई झाल्याचे किंवा त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत नाही. वृक्षलागवड, पुनर्रोपण किंवा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी- शासकीय यंत्रणा किंवा खासगी संस्था आणि संघटनांकडून पावसाळ्यात दर वर्षी वृक्षारोपण करण्यात येते; मात्र त्यानंतर वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वृक्षारोपणानंतर त्यांचे संवर्धन होत नसल्याने रोपे सुकून जातात. यात आर्थिक नुकसानही होते. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीही वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. संवर्धनाची जबाबदारी घेत असल्यानंतरच वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.सामान्यांच्या पुढाकाराची गरज- वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी सामाजिक संस्था, संघटना, शासकीय यंत्रणेसह सर्वसामान्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन कामाचा एक भाग असल्याची भावना रुजली पाहिजे. तरच वृक्षसंवर्धन होईल. त्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.हिरवे खडकी शहर- खडकी शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. काही दिवसांपासून या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. याला आळा बसला पाहिजे. हिरवे खडकी शहर अशी ओळख कायम ठेवण्यासाठी शहरवासीयांनी पुढे आले पाहिजे आणि वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.
पर्यावरणदिनीच केली झाडांची कत्तल, खडकीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 3:00 AM