लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनाच्या महामारीमुळे रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. सकस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही त्रिसूत्री रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मेंदू, तसेच शरीराच्या प्रत्येक अवयवाशी झोपेचा अगदी जवळचा संबंध आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, असे वैद्यकतज्ज्ञांनी संशोधनाच्या आधारे सिद्ध केले आहे. मात्र, अवेळी आणि जास्त झोप अपायकारक असते, हेही विसरून चालणार नाही.
बिग थिंकमधील एका अहवालामध्ये झोप आणि आरोग्य यांचा संबंध उलगडणाऱ्या अभ्यासाचा उल्लेख करण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये ३५ ते ४४ वर्षे वयोगटांतील सुमारे ३६ टक्के लोकांनी झोपेवर परिणाम झाल्याचे कबूल केले. पुरेशी झोप होत नसल्यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधी वाढल्याचेही या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. शरीरातील जंतूसंसर्ग तसेच ॲलर्जीसारख्या लक्षणांविरोधात लढण्याचे काम नैसर्गिक प्रतिकारशक्ती करत असते.
कार्नेजी मिलान विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे २१ ते ५५ वर्षे वयोगटांतील १५३ निरोगी लोकांचा समावेश करण्यात आला. विलगीकरणात ठेवून त्यांच्या नाकात सर्दीचा विषाणू सोडण्यात आला. ज्या व्यक्ती ७ तासांपेक्षा कमी झोप घेत होते, त्यांना या विषाणूची लागण झाली. ज्या व्यक्ती ८ तास झोप घेत होते, त्यांच्यावर विषाणूचा काहीही परिणाम झाला नाही. यावरूनच झोपेचा प्रतिकारशक्तीशी जवळचा संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
-------------------------
* अनेक लोकांना झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याची सवय असते. झोपण्यापूर्वी कॅफिनचे सेवन केल्यास अपायकारक ठरते. कॉफी किंवा चहामुळे झोप उडते आणि कमी झोपेचा प्रतिकारशक्तीवर विपरित परिणाम होतो.
* झोपण्याच्या दोन-तीन तास आधी जेवावे. रात्रीचा आहार हलका असावा.
* झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर यांचा वापर टाळावा
* दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि झोपही उडते. त्यामुळे झोपताना सर्व वाईट विचार दूर सारावेत, सकारात्मक विचार करावा.
* पुरेशा झोपेला संतुलित आहार आणि व्यायामाची जोड मिळणेही आवश्यक आहे.
---------------------------
झोप किती हवी?
नवजात बाळ - १४ ते १६ तास
एक ते पाच वर्षे - १० ते १२ तास
शालेय मुले - ८ ते १० तास
२१ ते ४० वयोगट - ७ ते ८ तास
४१ ते ६० वयोगट - ७ ते ८ तास
६१ पेक्षा जास्त - गरजेनुसार
-------------------------------
“अपूर्ण झोपेमुळे ॲॅसिडिटी, डोकेदुखी, चिडचिडेपणा असा त्रास होतो. अपुऱ्या झोपेमुळे कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेचा स्वत:वर, कुटुंबावर, नातेसंबंधांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. झोप वरचेवर खालावत गेली तर निद्रादोष व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ‘लवकर झोपणे, लवकर उठणे’ हा नियम स्वत:ला लावून घ्यावा. कोणत्याही रोगाशी लढण्याची शक्ती अर्थात प्रतिकारशक्ती पुरेशा झोपेमुळे टिकून राहते.”
- डॉ. कविता चौधरी, जनरल फिजिशियन