लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना संसर्गाच्या अनेक लक्षणांपैकी एक म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे. पोटावर झोपल्याने यात काही प्रमाणात फरक पडून ऑक्सिजन पातळी सुधारू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
पोटावर म्हणजे पालथे सहसा कोणी झोपत नाही. उलट असे कोणी झोपले की त्याला एका कुशीवर झोपण्यास सांगितले जाते. पण कोरोना रूग्णांना असे झोपणे फायद्याचे ठरू शकते. विशेषतः ज्यांची ऑक्सिजन पातळी कमी होते आहे, अशा रुग्णांना याचा चांगला उपयोग होऊ शकतो.
फक्त पोटावर न झोपता त्या अवस्थेत दीर्घ श्वसन करावे. पालथ्या अवस्थेत फुप्फुसाचा तळ सरळ असतो. दीर्घ श्वसनाने हवा आत घेतली की या अवस्थेमुळे ती फुप्फुसात सर्वत्र पोहोचते. ही क्रिया वारंवार केल्याने फुप्फुस मोकळे होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण विलगीकरणात ठेवले जातात. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होत असेल तर त्यांनी हा प्रयोग करूनजहायला हरकत नाही. यात प्रकृतीला धोका नाही. त्रास होतो आहे असे वाटले तर लगेच थांबताही येते. ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासता येते. फक्त स्थूल व्यक्ती, गरोदर महिलांंनी वैद्यकीय सल्ला घेऊनच हा उपाय करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट
“कोरोनात ऑक्सिजन पातळी वाढणे फार आवश्यक असते. साधारण ८५ ते ९० पातळी असेल व हा प्रयोग केला तर ऑक्सिजन पातळी ९२ ते ९३ पर्यंत जाते. दिवसभरातून तसेच रात्रीही दोन ते तीन वेळा असे करून पाहायला काहीच हरकत नाही.”
- डॉ. सदानंद बोरसे, कन्सल्टिंग फिजीशियन
चौकट
पालथे झोपल्याने होणारे फायदे
* फुप्फुसात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचतो.
* रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते.
चौकट
असे करावे
* ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी तपासावी
* मान कुठल्यातरी एका बाजूला ठेवून पोटावर झोपावे.
* हात दोन्ही बाजूंना सरळ ठेवावेत.
* दीर्घ श्वसन म्हणजे हवा हळूहळू श्वास घ्यावा, हळूहळू सोडा.
* असे किमान चार वेळा करावे, चारी वेळा चार आवर्तने करावीत.
* पुन्हा ऑक्सिजन पातळी तपासावी
* फरक वाटल्यास दिवसातून तीन वेळा व रात्रीही तीन वेळा करावे