पुणे : रेंजहिल्स रोडवरील भोसलेनगर येथे एकाचवेळी दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी तेलंगणातून जेरबंद केले. उच्चभ्रू परिसरातील ज्या घरांना स्लायडिंग विंडो आहे, अशी घरे हेरून घरफोडी करत असल्याचे निष्पन्न झाले. नरेंद्र बाबू नुनसावत (वय २७, रा. हैदराबाद, तेलंगणा) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे हिरेजडित दागिने व रोख रक्कम असा २३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत भोसलेनगरमधील एका बांधकाम व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पत्नीसह तिसऱ्या मजल्यावर २५ नोव्हेंबर रोजी झोपले असताना चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील किचनची स्लायडिंग विंडो उघडून आत प्रवेश केला. बेडरूममधील वॉर्डरोब उचकटून त्यातून ९ लाख रुपयांची रोकड, सोन्याचे, हिऱ्याचे दागिने असा ३२ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास करत असताना या चोरट्यांनी येरवडा परिसरातही घरफोडी केल्याने निष्पन्न झाले. चतु:शृंगी व येरवडा पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने हैदराबाद येथे जाऊन नरेंद्र नुनसावत याला अटक केली. त्याच्याकडून २३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. नुनसावत साथीदारांसह परराज्यात जाऊन घरफोड्या करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे.
चतु:शृंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण, जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रूपेश चाळके, अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन, प्रदीप खरात, बाबूलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, सुधीर माने, अस्लम आत्तार यांनी ही कामगिरी केली.