लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर दुसऱ्या दिवशी उपलब्ध असलेल्या लसीनुसार किती जणांना लस दिली जाणार हे ठरविले जात आहे़ महापालिकेच्या हद्दीतील केंद्रांसाठी आदल्या रात्री आठ वाजताच सर्व स्लॉट खुले होतात. परंतु, अवघ्या काही सेकंदात हे स्लॉट बुक होत असल्याने, हे स्लॉट बुकिंग कोविन पोर्टलवर ऑटोमेटेड प्रोग्रॅम सेट करून मिळविले जात असल्याचा संशय आता निर्माण झाला आहे़
अशा प्रकारे गेल्या काही दिवसांपासून स्लॉट बुकिंग होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील पोर्टल नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे़ त्यामुळे याबाबत केंद्रीय अधिकाऱ्यांनाही माहिती आज देण्यात आली असून, हे स्लॉट बुकिंग रोखण्यासाठी पोर्टलमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर नावनोंदणी आवश्यक आहे़ मात्र, हे बुकिंग कोविन पोर्टलवरून होत असल्याने, कोणीही कुठलीही अपॉइंटमेंट घेऊ शकते. त्यामुळे यावर महापालिकेचे नियंत्रण नाही़ परिणामी, यासंदर्भातील तक्रारींची माहिती कोविन पोर्टलशी संबंधित अधिकाऱ्यांना ई-मेलद्वारे कळविण्यात आल्या आहेत अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, निर्धारित वेळेशिवाय कोविन पोर्टलवरून कोणाच्याही नावे अपॉइंटमेंट बुक करणे शक्य नसल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे़
मात्र, स्लॉट खुले झाल्यावर रेल्वे रिझर्व्हेशनकरिता ज्याप्रमाणे बल्क बुकिंग होत होते़ त्याचप्रमाणे या पोर्टलवरही बल्क बुकिंगसाठी ऑटोमेटेड प्रोग्रॅम लिहून विशिष्ट वेळेत सर्व अपॉइंटमेंट घेणेही शक्य असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे़ त्यामुळेच या स्लॉट बुकिंगला आळा घालण्यासाठी केंद्रीय अधिकाऱ्यांकडे महापालिकेच्या संबंधित विभागाने तक्रार केली आहे़
----------------------------------------