पुणे : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत अभियानाची गती शहरात मंदावली आहे. या अभियानांतर्गत महापालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठीचे उद्दिष्ट असल्याने पुढील दीड वर्षात महापालिकेला शहरात २८ हजार घरांमध्ये स्वच्छतागृह बांधणे बंधनकारक असताना गेल्या वर्षभरात महापालिकेने केवळ २ हजार स्वच्छतागृहे बांधली आहेत. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू असल्याने ज्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांतील ११ अधिकाऱ्यांना घनकचरा विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. महापालिकेकडून केलेल्या सर्वेक्षणात शहरात आणखी २८ हजार स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला १७ कोटी रुपयांंचा खर्च येणार असून, पालिकेच्या अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे. काही निधी केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून मिळणार आहे. ही स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पालिकेला आॅक्टोबर २०१७पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी त्याची जबाबदारी १५ क्षेत्रीय कार्यालयांकडे देण्यात आली होती. मात्र, त्यांतील अवघ्या ३ क्षेत्रीय कार्यालयांकडूनच चांगल्या प्रकारचे काम झाले असल्याने इतर १२ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार, दोन दिवसांत तातडीने लेखी खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...तर १४ वर्षे लागतीलस्वच्छतागृहांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनास अडीच वर्षांचा कालावधी मिळाला होता. त्यानुसार, क्षेत्रीय कार्यालयांना कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला आहे. मात्र, हे पहिल्या वर्षी १० हजार स्वच्छतागृहे होणे अपेक्षित असताना २ हजार स्वच्छतागृहे उभी राहिली. कामाची ही गती पाहता शहर हगणदरीमुक्त होण्यास सुमारे १४ वर्षे लागतील. त्यामुळे उर्वरित दीड महिन्यात प्रशासन २६ हजार स्वच्छतागृहे कशी उभारणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
स्वच्छ भारत अभियानात पालिकेची गती मंदावली
By admin | Published: March 18, 2016 3:15 AM